मुंबई मराठा ‘क्रांती’साठी सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 05:51 AM2017-08-07T05:51:24+5:302017-08-08T11:21:56+5:30

मराठा क्रांती मूक मोर्चाच्या मुंबईतील महामोर्चाची रंगीत तालीम विविध जिल्ह्यांतील बाइक रॅलीने रविवारी दाखवली आहे. त्यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून बुधवारी सकाळी ११ वाजता निघणारा मराठा समाजाचा महामोर्चा नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास मुंबईतील समन्वयकांनी व्यक्त केला आहे.

Maratha Maratha revolution is ready! | मुंबई मराठा ‘क्रांती’साठी सज्ज!

मुंबई मराठा ‘क्रांती’साठी सज्ज!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा क्रांती मूक मोर्चाच्या मुंबईतील महामोर्चाची रंगीत तालीम विविध जिल्ह्यांतील बाइक रॅलीने रविवारी दाखवली आहे. त्यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून बुधवारी सकाळी ११ वाजता निघणारा मराठा समाजाचा महामोर्चा नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास मुंबईतील समन्वयकांनी व्यक्त केला आहे.
महामुंबईचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले की, सोशल मीडिया आणि भित्तीपत्रकांच्या माध्यमातून मराठा क्रांती मूक मोर्चामधील प्रत्येक प्रतिनिधी महामोर्चाचा प्रसार व प्रचार करत आहे. आतापर्यंत तालुका आणि जिल्हानिहाय बैठका पार पडल्या असून स्वयंसेवकांना आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुमारे १२ हजार स्वयंसेवकांची आवश्यकता असून आतापर्यंत ५ हजार स्वयंसेवकांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. याशिवाय २५ लाख लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून महामोर्चाची माहिती पोहोचवण्यात यश आले आहे. मुंबईतील आॅटोरिक्षा, टॅक्सीपासून खासगी चारचाकी, दुचाकी वाहनांवर लावलेल्या स्टीकरमुळेही महामोर्चासाठी वातावरणनिर्मिती झाल्याची माहिती आहे.
वडाळा ट्रक टर्मिनल, बीपीटी सिमेंट यार्ड अशा मोजक्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. पिण्याच्या पाण्यापासून शौचालय आणि कचरा व्यवस्थापनाची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे.
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना ६० हजार रुपयांची मदत करण्याचे आवाहन मराठा क्रांती पक्षाचे अध्यक्ष अंकुश पाटील यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

जनजागृतीसाठी बाइक रॅलीचा धुरळा
मुंबईत निघणाºया महामोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी मराठा समाजातर्फे रविवारी राज्यातील विविध जिल्ह्यांत बाइक रॅलीचा धुरळा उडाला. मुंबईतील सांताक्रूझ आणि बोरीवली तसेच नवी मुंबई, पालघर अशा विविध ठिकाणी मोर्चांमध्ये शेकडो दुचाकीस्वार सामील झाले होते.

१५ मागण्यांचे निवेदन सादर

मराठा समाजाच्या महत्त्वाच्या १५ मागण्यांचे एक निवेदन सर्वपक्षीय आमदारांनी मिळून सरकारला सादर केले आहे. त्यातील प्रत्येक मागणीवर विधानसभेत चर्चा करून पूर्ण झाल्याची घोषणा सरकारने करावी, अशी मूक मोर्चाची अपेक्षा आहे. शिवाय या सर्व मागण्यांचा पाठपुरावा आणि चर्चा करण्याची जबाबदारी संघटनेने आमदारांवर सोपवली आहे.

असे असेल नियोजन...
विदर्भ, मराठवाड्यातून येणाºया मराठा बांधवांच्या चहा-नाश्ता, पाणी आणि शौचालयाची व्यवस्था मुलुंड चेकनाक्याशेजारील जागेत केली जाईल.
पश्चिम महाराष्ट्र व कोकणातून येणाºया मराठा बांधवांसाठी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये सर्व व्यवस्था केली आहे.
नाशिकहून येणाºया लोकांसाठी इगतपुरी येथील टोल नाक्याजवळील मोकळ्या जागेत सर्व व्यवस्था असेल.
पश्चिम महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यांतून पुणे व नाशिकमार्गे ट्रेनने येणाºयांसाठी कल्याण रेल्वे स्थानकावरच ‘टेक अवे फूड’च्या रूपात चहा-नाश्त्याची सोय असेल.
पनवेलमार्गे येणाºयांसाठी चेंबूरच्या फ्रीवेजवळील शिवाजी चौक परिसरात शौचालय आणि अल्पोपाहाराची व्यवस्था असेल.

Web Title: Maratha Maratha revolution is ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.