मराठा मोर्चात तरुणाईत सळसळता उत्साह...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:19 AM2017-08-10T04:19:05+5:302017-08-10T04:19:43+5:30
कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही, कुठलीही सवलत मिळत नाही, त्याचा उच्च शिक्षणातील संधी, नोकरीवर परिणाम होतो. पैशांअभावी उच्च, व्यावसायिक शिक्षण घेणे जमत नाही.
पूजा दामले
मुंबई : कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही, कुठलीही सवलत मिळत नाही, त्याचा उच्च शिक्षणातील संधी, नोकरीवर परिणाम होतो. पैशांअभावी उच्च, व्यावसायिक शिक्षण घेणे जमत नाही. त्यामुळे ‘आम्हाला आरक्षण हवे,’ असा सूर मुंबईत मराठा मोर्चात सहभागी झालेल्या तरुणांमध्ये उमटला. महामोर्चात लाखोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. त्यांच्यात सळसळता उत्साह दिसून आला. पण, त्यांनी कुठेही नियमांचे उल्लंघन केले नाही की कुठली हुल्लडबाजी. तरुणांनी शिस्तीचे दर्शने घडविले. प्रत्येक जिल्हा, गावातून तरुणांनी मुंबईत हजेरी लावली होती. विद्यार्थी गटागटाने मंगळवारी रात्रीच मुंबईत दाखल झाले होते. आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला एकत्र यायला हवे. म्हणूनच मी माझ्या बंधू-भगिनींबरोबर मोर्चात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानात आल्याची भावना सांगलीच्या पूजा पाटील हिने व्यक्त केली.