मुंबईत ६ मार्चला मराठा मोर्चा
By admin | Published: January 16, 2017 06:55 AM2017-01-16T06:55:42+5:302017-01-16T06:56:07+5:30
मराठा समाजाचा ३१ जानेवारीला मुंबईतील राज्यव्यापी महामोर्चा आता ६ मार्चला काढण्यात येणार आहे.
मुंबई : मराठा समाजाचा ३१ जानेवारीला मुंबईतील राज्यव्यापी महामोर्चा आता ६ मार्चला काढण्यात येणार आहे. तथापि, या मोर्चापूर्वी राज्यभर ३१ जानेवारीला चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय मुंबईतील वडाळा येथे झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या राज्यातील समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला.
सर्व प्रतिनिधींनी बैठकीत ३१ जानेवारीला मोर्चा काढण्यासंदर्भात आपली मते मांडली. राज्यात जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात मोर्चा काढल्यास निवेदन द्यायचे तरी कुणाकडे, असा मुद्दा या बैठकीत उपस्थित झाला. आचारसंहितेमुळे सरकार कोणताही निर्णय किंवा आश्वासन देणार नसल्याने मोर्चाचेअपेक्षित फलित मिळणार नाही, अशीही चर्चा झाली. (प्रतिनिधी)
>अधिवेशनाचा काढला मुहूर्त
31 जानेवारीला राज्यभर चक्का जाम आंदोलन करून विधिमंडळ अधिवेशन काळात म्हणजेच ६ मार्चला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. या बैठकीत मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरसह अमरावती, अकोला आणि विदर्भातील प्रतिनिधी उपस्थित होते.