पुण्यात २५ सप्टेंबरला मराठा मोर्चा
By admin | Published: September 15, 2016 01:28 AM2016-09-15T01:28:54+5:302016-09-15T01:28:54+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार करणाऱ्या नराधमांवर राज्य शासनाने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ताबडतोब या खटल्याची सुनावणी खास जलदगती न्यायालयात सुरु करावी
पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार करणाऱ्या नराधमांवर राज्य शासनाने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ताबडतोब या खटल्याची सुनावणी खास जलदगती न्यायालयात सुरु करावी. या गुन्ह्यातील नराधमांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात यावी या प्रमुख मागणी सह इतर मागण्यांसाठी रविवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी विराट मराठा मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
गेल्या काही दिवसांत बीड, परभणी, नाशिक या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. यावेळी कोणती घोषणा नाही की कुठला पक्ष अथवा संघटनेचे बोर्ड नाहीत, फक्त हातात भगवे ध्वज घेऊन हा मोर्चा काढला जातो.
समाजाच्या वतीने आत्तापर्यंत राज्यातील ७ ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर आता पुण्यात मोर्चा काढण्यासाठी मराठा समाजातील लोकांनी तरुणांसह अनेकांनी पुढाकार घेतला आहे. रविवारी सकाळी मोर्चाला १०.३० वाजता डेक्कन जिमखाना येथील मुठा नदीच्या पात्राच्या मोकळ््या मैदानापासुन प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका टॉकीज चौक, लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौक, संत कबीर चौक, नाना पेठ, क्वॉर्टर गेट, हॉटेल शांताई मार्गे लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषद, हॉटेल ब्ल्यु नाईल मार्गे विधान भवनावर मूक मोर्चा नेण्यात येणार आहे.
मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे मोर्चे निघत असुनही सरकारकडून त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही. त्याचबरोबर कोपर्डी प्रकरणाची तपासाची गती समाधानकारक नाही असेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
तसेच, काही जणांकडून? अॅट्रॉसिटी रद्द करण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे असा चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहचत आहे परंतु मराठा समाजाचा अॅट्रॉसिटीला विरोध नसून त्यातील काही जाचक अटीला विरोध आहे. अॅट्रॉसिटी रद्द न होता त्यामध्ये योग्य ती सुधारणा व्हावी अशी मागणी मराठा समाज क्रांती मोचार्ची आहे.
(प्रतिनिधी)