मराठा असल्यानेच माझा छळ; ‘आयजी’ची आत्महत्येची धमकी
By admin | Published: November 8, 2016 05:33 AM2016-11-08T05:33:04+5:302016-11-08T05:33:04+5:30
‘मराठा असल्याने माझा छळ केला जात आहे. या छळाला कंटाळून मी आत्महत्या करण्याच्या स्थितीत आलो असून माझ्या आत्महत्येस आपणच जबाबदार असाल’
अमरावती/ यवतमाळ : ‘मराठा असल्याने माझा छळ केला जात आहे. या छळाला कंटाळून मी आत्महत्या करण्याच्या स्थितीत आलो असून माझ्या आत्महत्येस आपणच जबाबदार असाल’, असा खळबळजनक ‘व्हॉट्स अप’ संदेश अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या नावे पाठविल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
‘डीजीपींकडून होणारी सततची अवहेलना सहनशिलतेपलिकडची आहे. त्यामुळे आत्महत्येची वेळ आली असून स्वत:ला संपविण्यापूर्वी छळाबाबतची प्रत्येक गोष्ट माध्यम आणि कौटुंबिक सदस्यांकडे मांडेन’ अशी धमकीही जाधव यांनी या संदेशात दिली आहे. आत्महत्येची धमकी देणारा हा संदेश जाधव यांनी रविवारी रात्री काही पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविल्यानंतर तो काहींनी डीजीपींकडे ‘फॉरवर्ड’केला. शिवाय, हा संदेश सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर अमरावती परिक्षेत्रासह राज्याच्या पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
माध्यमांना भेटण्यास अधिकाऱ्याचा नकार
आत्महत्येच्या कथित धमकीसंदर्भात आयजी विठ्ठल जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, दिवसभर त्यांचा मोबाईल स्वीचआॅफ होता. संध्याकाळी तो सुरू झाला तरी त्यावर ‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ...’ ही रिंगटोन ऐकू येत होती. पण फोन उचलला जात नव्हता.
जाधव यांच्या निवासस्थानी संपर्क साधला असता
‘त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते कुणासही भेटू इच्छित
नाहीत’ असे सांगण्यात आले. सोमवारी नेहमीप्रमाणे जाधव कार्याल्यात आले होते. मात्र, त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिला.
वादामागे उमरखेड दंगलीची पार्श्वभूमी
उमरखेड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. त्यात राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, पोलीस कर्मचाऱ्यांसह १६ जण जखमी झाले होते. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्कालीन ठाणेदार अनिल पाटील यांनी हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाची चौकशी अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी केली. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव शांततेत पार पडला असताना उमरखेडमध्ये त्याला गालबोट लागले. या घटनेनंतर उमरखेडचे ठाणेदार अनिल पाटील यांची तेथून बाभूळगाव
येथे बदली करण्यात आली. मात्र, पाटील यांना पाठिशी घातल्याचा आरोप आयजी जाधव यांच्यावर आहे. त्यातूनच पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठांशी त्यांचा खटका उडाला होता.
राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून माझी सर्वंकष जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने अधिनस्त यंत्रणेला वेळोवेळी सूचना दिल्या जातात. तशा सूचना जाधव यांनासुद्धा देण्यात आल्या. मद्याच्या अंमलात असताना त्यांनी कुणाला काय संदेश पाठविला, याबाबत मला सांगता येणार नाही.
- सतीश माथूर, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य.
उमरखेड दगडफेकीच्या घटनेची अपर अधीक्षकांमार्फत सखोल चौकशी करून अहवाल महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. तो गोपनीय असल्याने त्याबाबत अधिक काही सांगता येणार नाही. मात्र जिल्हा पोलीस यंत्रणेच्या कामकाजातील सुधारणांबाबत वरिष्ठ पातळीवरून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
- अखिलेशकुमार सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ.