देशात जातीय विषमता राहू नये, जातीय जनगणना गरजेची नाही; RSS नं पंचसूत्री सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 12:44 PM2023-12-19T12:44:49+5:302023-12-19T12:45:17+5:30
जातनिहाय जनगणनेची आवश्यकता नाही. जात जाहीर करण्याची आवश्यकता नाही असं आरएसएसनं म्हटलं.
नागपूर - राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा-ओबीसी संघर्ष सुरु असताना जातनिहाय गणना करावी अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. परंतु जातीय जणगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जातीय विषमता नष्ट करायची असेल तर जातगणना गरजेची नाही असं विधान RSS च्या विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी केले आहे.
नागपूरच्या रेशीमबागेत हेडगेवार आणि गोळवळकर यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम झाला. त्याठिकाणी श्रीधर गाडगे म्हणाले की, सत्तेमध्येही आणि राजकीय क्षेत्र महत्त्वाचे आहे.त्यादृष्टीने आमदारांना मार्गदर्शन करताना पाच बिंदू मांडले.आपल्या देशात जातीय विषमता राहू नये. संपूर्ण देशातील जनता समरसतेने वागावी.देशातील कुटुंब पद्धतीचा पुन्हा विकास व्हावा. पर्यावरणाचे संतुलन लोकांनी ठेवावे. आत्मनिर्भर भारत व्हावा यासाठी आपले जे कर्तृत्व आहे ते केले पाहिजे. आपण नागरी तत्वाचे पालन करावे अशा पाच गोष्टी संघाने आमदारांसमोर ठेवल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच जातनिहाय जनगणनेची आवश्यकता नाही. जात जाहीर करण्याची आवश्यकता नाही. एकीकडे जातीचा उहापोह करणार, जात जनगणना करणार आणि दुसरीकडे जातीभेद नष्ट झाले पाहिजे असं म्हणायचे पण तसे होत नाही.जर जात विस्मरणात जातेय तर होऊ द्यावे. कारण जात कुणीही निर्माण करत नाही. जन्मापासून ती माणसाला मिळते. संघात जातीय व्यवस्था मांडली जात नाही. जातीचा विचार संघात केला जात नाही. त्यामुळे जातीनुसार जणगणना करणे हे काही सोयीचे नाही असं आम्हाला वाटते अशी प्रतिक्रिया आरएसएसचे श्रीधर गाडगे यांनी दिली आहे.
छगन भुजबळांनी केली जातीय जनगणनेची मागणी
मराठा ५० टक्के आहेत की ओबीसी ५४ टक्के आहेत हे पाहण्यासाठी जातीय जनगणना होऊ जाऊद्या.जातगणना केली तर ओबीसी किती ते समजेल. कुठल्या समाजाची किती लोकसंख्या आहे ते कळेल. जातीजातीतील संघर्ष वाढतायेत. मनुष्य ही जात आहे ती धरून वागले पाहिजे परंतु वास्तविक व्यवहारात ते होत नाही. प्रत्येक ठिकाणी लोकसंख्या किती हा प्रश्न निर्माण होतोय असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.