संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 04:28 PM2023-11-18T16:28:36+5:302023-11-18T16:33:48+5:30

प्रकाश आंबेडकरांनीही आम्हाला सहकार्य केले पाहिजे. आम्हाला सांगा, आमचे कुठे चुकले? असंही भुजबळांनी म्हटलं.

Maratha-OBC: Chhagan Bhujbal's reaction to Sambhajiraje Chhatrapati's statement | संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला

संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला

नाशिक - संभाजीराजे म्हणाले, भुजबळ दोन समाजात वितुष्ट आणतायेत, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. संभाजीराजे, आम्ही तुमचा आदर सन्मान करतो, आमच्या हृदयात असलेले छत्रपती शाहू महाराज हे मागासवर्गीयांना वर आणण्यासाठी लढत होते. शाहू महाराज यांच्या गादीवर तुम्ही बसलेले आहात. तुम्ही एका समाजाचे नाही तर राज्यातील सर्व समाजाचे आहात. तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता? तुम्ही यात पडायला नको होतं, जर आरक्षणाच्या लढाईत आला तर सगळ्यांचे अधिकार शाबूत ठेवा, कुणावरही अन्याय करू नका ही अपेक्षा संभाजीराजेंकडून आम्हाला आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीवर दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, घरेदारे कुणी जाळली? राज्यात २ महिने सुरू होतं, मी काही बोललो नाही. संभाजीराजे तुमचे काम होतं, हे असं करू नका. तुम्ही स्वत: बीडला जायला हवं होते. ज्यांची घरे, दुकाने जाळण्यात आली. पेट्रॉल बॉम्ब टाकले. महाराज तुम्ही त्यांचे अश्रू पुसायला हवे होते. पण तुम्ही माझ्यावर आरोप करता, एक लक्षात घ्या, छगन भुजबळांना मंत्री, आमदारकीची पर्वा नाही. मी गोरगरिबांसाठी लढेल. पण तुम्ही राज्यात महाराज आहात ना...छत्रपती शाहूंच्या गादीवर तुम्ही बसता, तर महाराज सगळ्यांना न्याय द्या, कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या असा सल्ला त्यांनी संभाजीराजेंना दिला.

तसेच प्रकाश आंबेडकरांनीही आम्हाला सहकार्य केले पाहिजे. आम्हाला सांगा, आमचे कुठे चुकले? आम्ही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो, राज्यात जे जे समजदार आहेत, वेगवेगळे पक्ष असतील त्यांनी आमचा आक्रोश काय आहे हे समजून घ्यावे. आम्हाला कुणालाही नाही म्हणतोय. आम्ही जायचं कुठे? तुम्ही समजदार असाल आमचे चुकले कुठे हे सांगा. बाकीचे चुकत असेल तर त्यांनाही सांगा. सगळ्यांना बरोबर घेऊन जा, आजपर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, सगळ्यांना बरोबर घेऊन गेले असंही भुजबळ म्हणाले.

आज भुजबळ वाईट झाला

महिला आयोगाच्या चेअरमन, विधान परिषदेच्या उपसभापती असतील त्यांनी जालनात महिला पोलिसांसोबत काय झाले हे विचारा. मग रिपोर्ट करा. मी खोटे बोलत असेन तर महाराष्ट्राची क्षमा मागेन. एका नाही तर ५० लोकांची चौकशी केली. हे तुम्ही करा, शांततेने जे काही मागायचे ते मागा. मी नाशिकचा पालकमंत्री होतो, कधीही मराठा बिगर मराठा वाद आणला नाही. अनेकांना याठिकाणी निवडणुकीत उभे केले निवडून आणले. कधीही जात पाहिली नाही. आता छगन भुजबळ वाईट झाला, तुम्हाला तुमचा समाज दिसतो, मीदेखील ३७४ जातींचे प्रतिनिधीत्व करतो. त्यात भटके विमुक्त सगळेच येतात. ओबीसीत ३७४ जाती आहेत. ते पुढे जातायेत. मग कशासाठी हे सगळे चाललंय असा सवाल भुजबळांनी केला आहे.

अभ्यास असणाऱ्यांनी पुढे यावे

जात जनगणना करा, जे नक्कीच कुणबी आहे त्यांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही. परंतु काही ठिकाणी शाही खोडून पेनाने कुणबी,कुणबी लिहिलं जातंय, हे लक्षात येतंय. तुम्ही वेगळे आरक्षण घ्या, अगोदर जे ओबीसीत आहेत त्यांनाच आरक्षण पुरत नाही. राज्यात जिल्ह्यात अनेक मराठा कार्यकर्ते आहेत. ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे. त्यांना जरांगेंची मागणी चुकीचे असल्याचे लक्षात येत नाही? साताऱ्यात आमची भगिनी चव्हाण म्हणून तिने स्पष्ट सांगितले, आम्हाला द्यायचे असेल तर मराठा आरक्षण द्या, कुणबी म्हणून नको असं सांगणारेही मराठा बंधू भगिनी राज्यात आहेत. पण तुम्ही लोकांची घरे जाळून अशाप्रकारे मागणी करताय त्याला आमचा विरोध आहे असं भुजबळांनी स्पष्ट सांगितले.

 अन्याय सहन करणार नाही

१९६० मध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळाली तेव्हा एका पत्रकाराने यशवंतराव चव्हाण यांना विचारले, साहेब हे राज्य मराठींचे होणार की मराठ्यांचे होणार? तेव्हा चव्हाण म्हणाले, मराठ्यांचा नाही तर मराठीचा महाराष्ट्र होणार. मग आता राज्यात काय चाललं आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय, जो तो येतो, म्हणतो, याला मंत्रिपदावरून काढा, आयुष्यात आमदार, मंत्री होणे हेच सर्वस्व आहे का? आमदारकी, मंत्रीपेक्षा मला ३७४ जातीतील ८ कोटी लोकांच्या भवितव्यासाठी ३५ वर्ष लढला आणि यापुढेही लढणार. आमच्यात नको, वेगळे आरक्षण घ्या असं बोललो म्हणून एवढे. अन्याय सहन करणार नाही असं भुजबळांनी म्हटलं.

Web Title: Maratha-OBC: Chhagan Bhujbal's reaction to Sambhajiraje Chhatrapati's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.