मातोरीतल्या दगडफेकीच्या घटनेमागे भुजबळांचाच हात; मनोज जरांगे पाटलांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 03:16 PM2024-06-28T15:16:33+5:302024-06-28T15:17:52+5:30
बीड जिल्ह्यातील मातोरी इथं झालेल्या दगडफेकीच्या घटनेंवरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.
बीड - राज्यात दंगली घडवण्याचा नाद छगन भुजबळांना आहे. शांतता राहू द्यायची नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी यावर लक्ष दिले पाहिजे. त्यांनी हा विषय सहज घेऊ नये. ओबीसी आंदोलकांना उपोषणाला भुजबळांनीच बसवलं. आमचे आणि ओबीसी बांधवांचे काही नाही. परंतु भुजबळांना पेटवापेटवी करायची, संघर्ष घडवून वाद निर्माण करायचाय असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गोरगरिब मराठे, ओबीसी अडचणीत आले पाहिजे असं भुजबळांना वाटते. त्यामुळे मातोरीत जे काही घडले ते त्यांनीच करायला लावले असेल. चिथावणी द्या, वाईट बोला. लोकांना डिवचण्याची सवय लागलीय. मला १०० टक्के भुजबळांवर संशय आहे. ओबीसी-मराठ्यात दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवण्यामागे षडयंत्र आहे हे गृहमंत्री फडणवीसांनी समजून घेतले पाहिजे असंही त्यांनी सांगितले.
तसेच छगन भुजबळांवर लक्ष ठेवा, विनाकारण तोच त्यांच्या गाड्या फोडायला लावेन, मराठ्यांवर आरोप घेईल. बीड जिल्ह्यातील एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे. मातोरी गावातल्या आणि बीड जिल्ह्यातील मराठ्यांवर अन्याय करू नका. राज्यातला मराठा समाज गप्प बसणार नाही. छगन भुजबळ सगळ्या जातीधर्मात तेढ निर्माण करतोय. जालन्यात दंगड घडवायची होती. पण मी दंगल होऊ दिली नाही. इथं डाव अयशस्वी झाला म्हणून मातोरीत दंगल घडवायचा प्रयत्न केला जातोय. जाणुनबुजून स्वत:च्या गाड्या फोडून गोरगरिब मराठ्यांवर आरोप घालायचा ही त्यांची रणनीती आहे असा आरोपही मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांवर केला.
दरम्यान, सत्तेचा दुरुपयोग करून मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न आहे. एकाही माणसाला त्रास होता कामा नये. अन्यथा राज्यातील सर्व मराठा समाज तिथे जाईल. ओबीसी आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे. ओबीसी नेते राज्यातील गोळे करायचे, चिथावणी देणारी भाषणे करायची. आमच्या आंदोलनाला परवानगी भुजबळांमुळेच नाकारली. हे राजकारणी लोक आहेत. छगन भुजबळ राजकारणी, दंगल घडवून तेढ निर्माण करतील पण गोरगरिब मराठा, ओबीसींना हे भोगावे लागेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.