जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा; मनोज जरांगेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 02:22 PM2023-11-27T14:22:28+5:302023-11-27T14:23:04+5:30

भुजबळांना बाकी काही काम नाही. माझ्या वक्तव्याचा अर्थ समाजाशी नाही. मी जातीवाद करतो असा एकही माणूस दाखवावा. मी सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी सहकार्य करतो. मराठा आरक्षणाच्याविरोधात बोलले तर सुट्टीच देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं.

Maratha-OBC: File a case against Chhagan Bhujbal; Manoj Jarange Patil demand | जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा; मनोज जरांगेंची मागणी

जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा; मनोज जरांगेंची मागणी

छत्रपती संभाजीनगर - छगन भुजबळ या वयात जातीजातीत दंगली निर्माण करायला लागलेत. सरकार भुजबळांच्या दबावाखाली का येतंय?. सरकार नेहमी ओबीसी नेत्याचे ऐकतंय. काय संबंध आहे? सरकारनं ओबीसी नेत्याचं ऐकून गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करू नका ही हात जोडून विनंती आहे. खूप दिवस खाल्लंय, आता या वयात दंगली भडकवण्याची भाषा करतायेत.भुजबळांची भाषा भयंकर आहे. जातीवाचक शब्दाबद्दल छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करायला हवी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भीमा-कोरेगाव उल्लेख करताना तुम्ही जो जातीवाचक शब्द वापरला. सरकारने या जुनाट नेत्याला रोखले पाहिजे. यांच्यामुळे जातीजातीत तेढ निर्माण होतंय. तुम्ही काहीही केले तरी मराठा-दलित समोरासमोर येणार नाही. मी ओबीसींबाबत बोलत नाही तर जुनाट नेत्यांबाबत बोलतोय. सरकारने यांना रोखले नाही तर आम्हीदेखील हिशोब पूर्ण करू. भुजबळांनी हिंगोलीच्या सभेत जातीवाचक शब्द वापरला. महार शब्दाचा उल्लेख केला.का त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. आमच्या दलित बांधवांना कशासाठी जातीवाचक बोलता.मी बोललेल्या विधानाचा आणि जातीचा कुठेच संदर्भ येत नाही.लायकी शब्दात जातीचा शब्द येत नाही. तुम्ही थेट जातीचा शब्द वापरून दलित बांधवांचा अपमान केला. दलित बांधवांची गरज लागली म्हणून आज तुम्ही विधाने करताय, हुतात्मा स्मारक गोमुत्राने धुवून काढले होते ते विसरला का? असं नसते. आम्ही एखादा शब्द बोललो तर तुम्ही जातीय रंग द्यायला लागला. दलित बांधव आणि आमची दुश्मनी आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. 

तसेच सामान्य ओबीसी बांधवांसोबत आमची दुश्मनी आहे का? त्यांनाही पश्चाताप येत असेल याला गोरगरिब लेकरांची कामे करतील यासाठी निवडून दिलंय. आज २९ जाती बाहेर पडल्या. या लोकांमुळे आम्हाला आरक्षण मिळत नाही अशी बातमी आहे. ओबीसीतूनच वेगळा प्रवर्ग करा अशी मागणी होऊ लागली. हा त्या जातींवर अन्याय नाही का?. कायदा एवढा कळतोय, तर मराठा समाजाच्या शासकीय नोंदी सापडल्या, ही कागदेही आणा. नुसते आयुष्यभर विदुषकपणा अंगात आहे. पहिल्यापासून तेच केले, आताही तेच करताय, ज्यांनी मोठे केले त्यांना छाटत छाटत पुढे आले.गावबंदीमुळे शिक्षा होते हा कागद आणला तसा मराठ्यांच्या नोंदी सापडल्याने त्यांना ओबीसीत येता येते हादेखील कागद आणावा, ते जमत नाही का? का डोळे गेलेत तुमचे? असा पलटवारही जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केला. 

'त्या'विधानावर जरांगे पाटील यांचं स्पष्टीकरण

लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय यात चुकीचे काय बोललो? आमचे लोक सुशिक्षित बेकार झालेत, त्यांचे हाल होतायेत. फक्त याला जातीय रंग देऊ नका. भुजबळांना बाकी काही काम नाही. माझ्या वक्तव्याचा अर्थ समाजाशी नाही. मी जातीवाद करतो असा एकही माणूस दाखवावा. मी सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी सहकार्य करतो. मराठा आरक्षणाच्याविरोधात बोलले तर सुट्टीच देणार नाही. जातीवाचक बोलतायेत म्हणून ४-५ गेले. जुनाट नेते आहात. अनुभवी आहात. तुमच्या मांडीला मांडी लावून बसायलाही ओबीसी नेते नको म्हणायला लागलेत. हुशार व्हा. नुसता अनुभव आहे, केस पिकलेत. जातीजातीत तेढ निर्माण करायला लागेलत. सरकार दबावात यायला लागलेत असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

२४ तारखेपर्यंत थांबा, माझ्याकडे यांचा इतिहास आहे. सगळं सांगतो...

नुसते मराठ्यांना आरक्षण मिळाले म्हणून राज्यात उद्योग येत नाही का? आम्ही शांततेत आरक्षणाची मागणी करतोय. कायद्याच्या चौकटीत आरक्षण मागतोय. राज्यात शांतता निर्माण व्हावी यासाठी समाजाने शांतता बाळगावी. वातावरण दुषित होईल असं वागू नका. कायदेशीर, संविधान मार्गाने आम्ही ओबीसी आरक्षणात जाणार आहोत. सगळ्या नोंदी सापडल्या आहेत. स्वस्वार्थासाठी समाज अडचणीत येईल असं कृत्य करू नका. २४ डिसेंबरपर्यंत शांत राहा. आम्ही शांततेत आरक्षण मागतोय, वातावरण दुषित ते करतायेत. अंबड, हिंगोलीची सभा बघा, अंबड ते हिंगोली यात ४ ताकदवान नेते सोडून गेले. भुजबळांच्या सभेला नको जायला असं त्यांना वाटते. त्यामुळे आपण चुकीच्या मार्गाने चाललोय हे त्यांच्या लक्षात यायला हवे. या राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडायला नको. या जुनाट नेत्याला थांबवा, हे जातीशिवाय बोलतच नाही. आम्ही स्वराज्याच्यावेळी केलेले सहकार्य विसरलो नाही.एखाद्या जातीला आरक्षण मागणे म्हणजे जातीवाद म्हणत नाही.सगळा समाज हुशार झाल्याने कुणीही आता त्यांना फसणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले. 

Read in English

Web Title: Maratha-OBC: File a case against Chhagan Bhujbal; Manoj Jarange Patil demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.