आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यात एकवाक्यता नाही - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:08 PM2023-11-29T16:08:03+5:302023-11-29T16:08:45+5:30

राज्यात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

Maratha-OBC: There is no unanimity between the Chief Minister and the Ministers in the matter of reservation - Jayant Patil | आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यात एकवाक्यता नाही - जयंत पाटील

आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यात एकवाक्यता नाही - जयंत पाटील

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री यांच्यात आरक्षणाच्या बाबतीत एकवाक्यता दिसत नाही. राज्याचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचे व जाती- जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सध्या केले जात आहे. मंत्री मंडळात जे एकत्र बसतात त्यांनी एकमुखाने भूमिका मांडली पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही असा आरोप शरद पवार गटाचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील म्हणाले की, मंत्री मंडळातील मंत्री आतमध्ये बसून भूमिका मांडण्यास कमी पडत आहेत म्हणून त्यांना बाहेर येऊन आपली भूमिका मांडावी लागत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. म्हणजे हे सर्व ठरवून सुरु आहे की काय? असा प्रश्न निर्माण होतो. ओबीसींच्या बाबतीत व मराठ्यांच्या बाबतीत सरकारची काय भूमिका आहे हे मुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने स्पष्ट केले पाहिजे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली आहे. त्यावर सरकारने योग्य ती पाऊले उचलणे गरजेचे आहे. राज्यात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत असं त्यांनी म्हटलं. 

शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार

राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विम्याच्या बाबतीत सरकारने अनेक घोषणा केल्या. पण मदत मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. विदर्भात तुरीच्या पिकांचे, नंदुरबारमध्ये मिरचीचे तर जळगाव व नाशिकमध्ये द्राक्ष व कांद्याचे नुकसान झाले आहे. तसेच, या अवकाळी पावसामुळे जनावरांचेदेखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी त्याची अंमलबजावणी होईल असे वाटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा व ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी जळगाव, शुक्रवारी १ डिसेंबर रोजी नाशिकच्या दिंडोरी येथे तर ५ डिसेंबर रोजी अमरावती येथे हा मोर्चा निघेल व राज्य स्तरावरील पक्षाचे महत्वाचे नेते त्यात सहभागी होतील असं जयंत पाटील यांनी माहिती दिली. 

महायुतीवर टीका

कोणताही विषय आला तर सध्याचे सरकार महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवते. मविआ म्हणून आम्ही सर्व मित्र पक्ष एक दिलाने काम करत आहोत. राज्यावर कोरोनाचे सावट असतानाही मविआ शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आज सरकारकडून फक्त घोषणाच केल्या जात आहेत. अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे, तर पिकांवर वेगवेगळे रोग पसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पीक विम्याचे पैसे जर दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिले नाही तर आम्ही दिवाळी साजरी करणार नाही असे मंत्र्यांचे म्हणणे होते. मात्र, पुढे तसं काहीच झालेलं दिसलं नाही अशी टीका जयंत पाटलांनी महायुती सरकारवर केली. 

Web Title: Maratha-OBC: There is no unanimity between the Chief Minister and the Ministers in the matter of reservation - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.