बेळगावात घुमला मराठ्यांचा बुलंद आवाज!
By admin | Published: February 17, 2017 02:54 AM2017-02-17T02:54:27+5:302017-02-17T02:54:27+5:30
न्याय-हक्कासाठी आवाज उठविण्याकरिता आम्हाला कोणत्याही सीमांचे बंधन नाही, हे सकल मराठा समाजाने बेळगावमध्ये गुरुवारी ठणकावून सांगत क्रांती मूक
संतोष मिठारी, प्रदीप शिंदे, प्रकाश बेळगोजी / बेळगाव
न्याय-हक्कासाठी आवाज उठविण्याकरिता आम्हाला कोणत्याही सीमांचे बंधन नाही, हे सकल मराठा समाजाने बेळगावमध्ये गुरुवारी ठणकावून सांगत क्रांती मूक मोर्चातून सीमाप्रश्नाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधले. कर्नाटकातील कानाकोपऱ्यासह महाराष्ट्र, गोवा राज्यांतून सुमारे दहा लाख समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. इतिहासात मराठ्यांचा पराक्रम पाहिलेल्या या भूमीत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून वेगळा इतिहास घडविला.
प्रशासनाच्या विरोधी भूमिकेमुळे बेळगावमधील या सकल मराठा व मराठी क्रांती मूक मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. प्रशासनाने मोर्चाच्या आदल्याशिवाय जाचक अटी घालूनसुद्धा मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा समाज निर्भीडपणे सहभागी झाला.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला रणरागिणींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेदहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या मार्गावर स्वयंसेवकांनी मानवी साखळी करून प्रथम युवती, महिला, ज्येष्ठ व्यक्तींना सोडले. त्यापाठोपाठ पुरुष, युवक सहभागी झाले. कोणत्याही घोषणा, जयजयकार न करता लाखोंचा जनसमुदाय मोर्चाच्या आचारसंहितेचे पालन करीत शिस्तीबद्धपणे पुढे सरकत होता. कपिलेश्वर उड्डाणपूल, शनि मंदिर, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, संयुक्त महाराष्ट्र चौक, डॉ. राजेंद्रप्रसाद चौक मार्गे धर्मवीर संभाजी चौकात मोर्चा पोहोचला. तेथे रणरागिणींचे भाषण झाले. त्यानंतर या मुलींनी जिल्हाधिकारी एन. जयराम यांना निवेदन दिले.