...मग आम्ही त्यांच्यासोबत का जायचं?; मनोज जरांगेंच्या उपोषणाला मराठ्यांचाच विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 05:49 PM2023-09-06T17:49:19+5:302023-09-06T17:49:49+5:30
मराठा आरक्षणासाठी समाज व्याकुळलेला आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल होतेय असं मराठा आक्रोश मोर्चाने म्हटलं.
सोलापूर – जालना येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून वातावरण पेटले आहे. जालनातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहील असा त्यांनी चंग बांधला आहे. त्यात आता सोलापूर येथील मराठा आक्रोश मोर्चातील समन्वयकांनी जरांगेंच्या आंदोलनाला उपोषणाला विरोध केला आहे.
सोलापूर मराठा आक्रोश मोर्चाचे किरण पाटील म्हणाले की, मनोज जरांगे हे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणून उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी ते बसले नाहीत. ते फक्त मराठवाड्या पुरते बसलेत. सोलापूरात ५८ मोर्चे निघाले होते. जोपर्यंत जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसी, कुणबी मराठा म्हणून घ्या म्हणत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही. मनोज जरांगे त्यांच्या प्रांतासाठी लढतायेत मग आम्ही त्यांच्यासाठी केसेस का घ्यायचे?आम्ही सोबत का जायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत जरांगे पाटील हैदराबद मुक्तीसंग्रामतील जी मराठा वंशावळ आहे त्यांच्यापुरते आरक्षण मागितले जात आहे. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले होते. परंतु दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने तो मुद्दा रखडला. ८० वर्षाचे तरुण म्हणून जे आता बाहेर पडलेत त्यांनी मराठा समाजाचा वापर केवळ कुटुंबासाठी, पक्षासाठी केलाय हे समाजाला माहिती आहे. समाजाची कुणीही दिशाभूल करू नये. मराठा समाजाला आरक्षण देणारा कुणीही असू द्या नेतृत्व केले त्याचा पाठिंबा आम्ही देऊ असं विधान मराठा मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी केले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी समाज व्याकुळलेला आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल होतेय, कुणबी मराठा आमच्यासोबत आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण आहे. जोपर्यंत राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही. राज्यातील इतर भागातील लोकांनी जे आंदोलन केले त्याचा फायदा केवळ मराठवाड्यातील मराठा समाजाला होणार आहे. हा राजकीय हेतून प्रेरित आंदोलन आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी केवळ मराठवाड्यातील मराठा समाजापुरते आंदोलन न करता राज्यातील मराठा समाजासाठी करावं असं आवाहन मराठा आक्रोश मोर्चाच्या वतीने केले आहे.