राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; आरक्षणावरून आक्रमक घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 07:05 PM2024-08-05T19:05:10+5:302024-08-05T19:05:40+5:30
आरक्षणावरून राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेचा विरोध करत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली.
धाराशिव - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज ते धाराशिव इथल्या हॉटेलला थांबले असताना काही मराठा आंदोलक त्या हॉटेलमध्ये शिरले. राज ठाकरेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अशी या आंदोलकांची मागणी होती. राज ठाकरेंनी वेळ द्यावी अशी मागणी करत मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत आक्रमक घोषणाबाजी केली.
यावेळी मनसे कार्यकर्तेही हॉटेलमध्ये होते, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीसही तैनात होते. आरक्षणावर राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी या कार्यकर्त्यांची मागणी होती. आंदोलनकर्ते घोषणाबाजी करत होते त्यावेळी राज ठाकरे स्वत: खाली आले आणि त्यांनी मराठा आंदोलकांना घोषणाबाजी करू नका, माझ्याशी बोलायला आहात तर वर या असं सांगितले. मात्र आंदोलनकर्ते आणखी आक्रमक झाले.
राज ठाकरे थांबले होते त्या हॉटेलमधील रुमबाहेरच मराठा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मराठा आंदोलकांचे शिष्टमंडळ राज यांना भेटण्यास आले होते. त्यावेळी राज ठाकरेंची भेट न झाल्याने चिडलेल्या आंदोलकांनी हॉटेलमध्ये ठिय्या दिला. आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा, मनोज जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मला असं वाटतं की यामध्ये जात येते कुठे? महाराष्ट्रातील आपल्या मुला-मुलींना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. महाराष्ट्र हे राज्य असं आहे की देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून आपण बघतो. खासगी संस्थांमध्ये आरक्षण आहे का? नेमकं किती मुलांना आरक्षण मिळणार आहे. हे आपण तपासणार आहोत का? माथी भडकवायची. हे सर्व जे राजकारण सुरू आहे ते कोणाच्या ना कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरू आहे. मतांसाठी राजकारण सुरू आहे. मुलामुलींच्या विचार करत नाही. हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत हे प्रत्येक समाजाने समजून घेतलं पाहिजे असं राज यांनी सोलापूर इथं म्हटलं होतं.