महाराष्ट्रात ६० टक्के OBC समाज, जर आमचे आरक्षण गेलं तर...; प्रकाश शेंडगेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 05:50 PM2023-11-08T17:50:54+5:302023-11-08T17:51:29+5:30
भुजबळांनी कायम ओबीसींची बाजू घेतली, आमचे नेते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असंही ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ठामपणे सांगितले.
मुंबई – सरसकट शाळांना मुख्यध्यापकांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत, जिथं मराठा नोंद आहे त्यासमोर पेनाने कुणबी लिहण्याचा घाट सुरू आहे. गावागावातील शाळांमध्ये अशाप्रकारे नोंदी करून सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू आहे. त्याला आमचा विरोध आहे. शिंदे समितीला कुठलाही घटनात्मक अधिकार नाही. कुठल्या जाती मागासलेल्या आहेत त्याचे सर्व्हेक्षण याआधीच झालेले आहे. मराठा समाजाने EWS मधील आरक्षण घ्यावे किंवा वाढवून आरक्षण द्यावे अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.
प्रकाश शेंडगे म्हणाले की, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले तरच ओबीसी-मराठा संघर्ष महाराष्ट्रात थांबेल. जे ओबीसींना ते मराठा समाजाला देण्याची सरकारची भूमिका आहे मग वेगळी मागणी कशाला? जर सरसकट मराठा समाजाला ओबीसीत कुणबी म्हणून घालण्याचा घाट घातला तर ओबीसी समाजाला रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नाही. भुजबळांनी जी भूमिका घेतली त्याचे समर्थन आम्ही केलंय, भुजबळ एकमेव मंत्री आहेत जे सरकारच्या मंत्रिमंडळात आमची बाजू घेतायेत, परंतु त्यांना टार्गेट केले जातंय असंही त्यांनी सांगितले.
तसेच छगन भुजबळांनी वेगळी भूमिका कुठे मांडली, जी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंबहुना सर्वपक्षांनी मांडली आहे तीच भूमिका भुजबळांनी मांडली. मग भुजबळांना टार्गेट करण्याचा विषयच नाही. ज्यावेळी मंडल आयोगाच्या शिफारशी महाराष्ट्रात लागू करण्याच्या शिफारशी केल्या तेव्हाही त्याचा निषेध म्हणून भुजबळांनी ओबीसींसाठी पक्षत्याग केला होता. भुजबळांनी कायम ओबीसींची बाजू घेतली, आमचे नेते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असंही ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, जे कोणी आमच्याविरोधात भूमिका घेतील, आम्ही इतके धनदांडगे नाही, रस्त्यावरची लढाई लाठ्याकाठ्या आम्ही करणार नाही. परंतु मतपेटीची लढाई ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही. जर आमचे आरक्षण गेले तर २०२४ च्या निवडणुकीत कुठलेही सरकार असो, त्याला धडा शिकवल्याशिवाय ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रात ६० टक्के ओबीसी समाज आहे. आम्ही असंघटित आहोत असं कुणी समजू नये. आता आमचे लाखोंचे मेळावे घेऊ, डिसेंबरमध्ये तालुकापातळीवर मेळावे घेऊन आम्हीही कुठे कमी नाही दे दाखवून देऊ असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला.