राज्यात मराठा आरक्षण कायदा लागू, २६ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 06:36 PM2024-02-27T18:36:40+5:302024-02-27T18:38:46+5:30
Maratha Reservation : २६ फेब्रुवारीपासून हे आरक्षण लागू झाले आहे. याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले.
Maratha Reservation : मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी सुरु झाली आहे. २६ फेब्रुवारीपासून हे आरक्षण लागू झाले आहे. याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले.
विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते. राज्यपालांनी त्यावर सही केल्यानंतर आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. यासंदर्भात शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही जारी करण्यात आले आहे. कायदा आणि न्यायपालिका विभागाचे सचिव सतीश वाघोले यांनी सही केली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गातंर्गत नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण लागू झाले आहे.
सध्या राज्यात आधीपासूनच सुरु असलेल्या शासकीय नोकरभरतीसाठी हे आरक्षण लागू नसेल. परंतु, २६ फेब्रुवारी आणि त्यानंतर सुरु होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी १० टक्के जागा आरक्षित असतील. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. दरम्यान आज राज्यात कायदा लागू झाल्याचे चित्र आहे.
आरक्षण दिल्याचा आनंद आहे - मुख्यमंत्री
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मला आनंद आहे… मी शपथ घेतलेली पूर्ण केली. मराठा समाजाला आरक्षण लागू झाले आहे. जीआर निघाला आहे. याचा फायदा मराठा तरुणांना नोकरीत आणि शिक्षणात होईल. याचे समाधान सरकार आणि मला आहे. या निर्णयाचा फायदा मराठा समाजाने घ्यावे.शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी बोललो होतो ते पूर्ण केले. कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याचा आनंद आहे."