Maratha Reservation : उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर मराठा समाजाचे आंदोलन अखेर मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 07:55 PM2018-11-29T19:55:54+5:302018-11-29T19:59:16+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांवरचे सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आझाद मैदानात मराठा आंदोलकांकडून सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मुंबई - मराठा आरक्षासंदर्भातील विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने पारित झाले. विधेयक पारित झाल्यानंतरही मराठा आंदोलकांकडून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू होते. अखेरीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांवरचे सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आझाद मैदानात मराठा आंदोलकांकडून सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मराठा आंदोलकांकडून आझाद मैदान येथे गेल्या काही दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू होते. दरम्यान, आज विधेयक पारित झाल्यानंतरही हे आंदोलन सुरूच होते. अखेर आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें य़ांनी या मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलकांनी हे उपोषण आंदोलन मागे घेतले. '' मराठा आंदोलकांवर खोटे खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हे सर्व खटले त्वरित मागे घेण्यात येतील. याशिवाय यामध्ये ज्यांना बनावट गुन्हांखाली अटक करण्यात आली, अशा लोकांची लवकरच सुटका करण्यात येईल. तसेच ज्या ठिकाणी मराठा आंदोलकांवर खोटे खटले दाखल करण्यात आले. हे सर्व खटले मागे घेण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.'' असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.