Maratha Reservation: राज्यात आंदोलन अद्याप धगधगतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 03:12 AM2018-07-29T03:12:30+5:302018-07-29T03:13:25+5:30
मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी पुढाकार घेतल्यानंतरही शनिवारी राज्यात आंदोलन धगधगतच होते. विशेष मराठवाड्यात हिंसक घटनांची पुनरावृत्ती झाली.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी पुढाकार घेतल्यानंतरही शनिवारी राज्यात आंदोलन धगधगतच होते. विशेष मराठवाड्यात हिंसक घटनांची पुनरावृत्ती झाली. जलसमाधी, रास्ता रोको, ठिय्या आंदोलनाद्वारे मराठा क्रांती संघटनेने सरकारवर दबाव कायम ठेवला आहे.
हिंगोली, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यात जाळपोळ आणि रस्ता रोको झाला. औरंगाबादमध्ये सहा कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरच हे आंदोलक खाली उतरले. परळीत ठिय्या आंदोलनाच्या अकराव्या दिवशी माजी. खा. रजनी पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
नाशिकमध्ये भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानासमोर बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन झाले. सानप व महापौर रंजना भानसी यांनी पाठपुराव्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित झाले. नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तहसीलवर ठोक मोर्चा काढण्यात आला.
पवार कोल्हापूरला आंदोलनात सहभागी!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापुरातील दसरा चौकात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास भेट दिली व कार्यकर्त्यांसमोरही भूमिका मांडली. पवार स्वत: अर्धा तास त्या आंदोलनात
सहभागी झाले होते. हे आंदोलन संयमाने पुढे न्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
अश्रुधूर, प्लॅस्टिक बुलेटचा मारा
परभणी जिल्ह्यात टाकळी कुंभकर्ण येथे सकाळपासूनच युवकांनी रस्ते अडवून धरले़ आंदोलन सुरू असतानाच दगडफेक सुरू झाली. जमाव पांगविण्यासाठी दुपारी १२़३० वाजता पोलिसांनी हवेत गोळीबार केला. त्यात १३ फैरी झाडण्यात आल्या़ त्यानंतरही जमाव शांत होत नसल्याने, दुपारी १़३० वाजता पोलिसांनी पुन्हा हवेत १७ फैरी झाडल्या. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून पोलिसांनी आंदोलकांवर प्लॅस्टिक बुलेट झाडल्या. त्यात तीन आंदोलक जखमी झाले. नांदेड जिल्ह्यात आंदोलकांनी एक बस व रुग्णवाहिका पेटविली.
आज लातूरला बैठक
मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभरातील समन्वयक लातुरात आले आहेत. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी येथे बैठक होणार आहे. यात शांततापूर्ण निदर्शने जाळपोळ, तोडफोड आदी घडामोडींचा आढावा घेतला जाईल.
मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये अडथळा आणू
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रविवारी जळगाव व सोमवारी सांगली येथे होणाºया सभेत अडथळा आणण्याचा इशारा क्रांती मोर्चाने दिला दिला आहे.