मराठ्यांविरुद्ध भुजबळांना उचकवण्याचा प्रयत्न अंबादास दानवे यांची भाजपवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 09:06 AM2024-02-03T09:06:32+5:302024-02-03T09:07:16+5:30
Ambadas Danve: छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणानंतर ओबीसींची भूमिका मांडली, मात्र भाजप त्यांना भूमिका मांडायला लावते आहे का, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पालघरमध्ये व्यक्त केले.
पालघर - छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणानंतर ओबीसींची भूमिका मांडली, मात्र भाजप त्यांना भूमिका मांडायला लावते आहे का, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पालघरमध्ये व्यक्त केले.
भाजप दुटप्पी पद्धतीने भूमिका मांडत असते. एकीकडे मराठ्यांना आणि दुसरीकडे ओबीसींना भुजबळांच्या माध्यमातून चुचकारायचे, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भुजबळ भाजपमध्ये गेल्याची बातमी आली तर महाराष्ट्राला आश्चर्य वाटायला नको, असेही त्यांनी सांगितले.पालघर येथे काँग्रेस भवनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्दद्यांवर भाष्य केले.
पोलिस अधिकाऱ्यांचा शिवसैनिकांवर दबाव
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश करा, नाहीतर गुन्हे दाखल करू, असा शिवसैनिकांवर काही पोलिस अधिकारी जाणीवपूर्वक दबाव आणत आहेत. हे योग्य नाही. सरकार बदलत असतात, हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे दानवे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याला डोमिसाइल सर्टिफिकेट मिळण्यासाठी १५ दिवस वाट बघावी लागत असेल तर हेच शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे फलित आहे का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
■ शासन आपल्या दारी नसून जनता शासनाच्या दारी फेरफटके मारत आहे, असेही ते म्हणाले.
■ वाढवण बंदराबाबत स्थानिक नागरिकांची जी भूमिका आहे, तीच भूमिका शिवसेनेची आहे. आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. ज्यावेळी वाढवण बंदर विरोधातील संघर्षाला बळ देण्याची गरज निर्माण होईल, तेव्हा शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी स्थानिकांसोबत असेल, असेही त्यांनी सांगितले.