Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर मान्यवरांचे शांततेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 02:04 AM2018-08-03T02:04:50+5:302018-08-03T02:05:20+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात समन्वय आणि संवाद साधण्याच्या उद्देशाने बोलाविलेल्या मराठा समाजातील मान्यवरांच्या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात समन्वय आणि संवाद साधण्याच्या उद्देशाने बोलाविलेल्या मराठा समाजातील मान्यवरांच्या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. या बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन काढून शांततेचे आवाहन करण्यात आले.
सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या बैठकीला साहित्य, संस्कृती, सामाजिक, उद्योग आदी क्षेत्रातील मराठा समाजातील मान्यवर उपस्थित होते. मराठा समाजाला कायदेशीर कसोटीवर टिकणारे आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठी शासनाने तत्काळ उचित पावले उचलावीत, असे आवाहन या मान्यवरांनी बैठकीत केले. तसेच, राज्यात शांतता प्रस्थापिक करण्याच्या दृष्टीने कुठेही हिंसाचार होऊ नये. तसेच कुणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करण्यात आले.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह.साळुंखे, माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले, प्रसिद्ध विचारवंत सदानंद मोरे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, समाजसेवक पोपटराव पवार, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, उद्योगपती बी. बी. ठोंबरे, अभिनेते सयाजी शिंदे, अमोल कोल्हे, कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, अलिबागचे रघुजीराजे आंग्रे, उल्हास घोसाळकर, जिजाबराव पवार, सतीश परब, अॅड. शैलेश म्हस्के, अॅड. हर्षद निंबाळकर, तानाजीराव शिंदे आदी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, एकनाथ शिंदे, सुभाष देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर हे मंत्रीही बैठकीला उपस्थित होते. शाहू छत्रपती, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार हे मात्र उपस्थित नव्हते.
निश्चित वेळेत आरक्षण देणार - मुख्यमंत्री
राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. त्याची कायदेशीर प्रक्रिया आम्ही वेगाने पूर्ण करीत आहोत. कालबद्ध आणि निश्चित वेळेत आम्ही आरक्षण देऊ असा मला विश्वास आहे. आजच्या बैठकीत विचारवंतांनी केलेल्या आवाहनामुळे राज्यात शांततरा प्रस्थापित होण्यास मोलाचे सहकार्य मिळेल, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.