Maratha Reservation : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, मात्र पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय नाही - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 04:07 PM2018-07-29T16:07:25+5:302018-07-29T16:50:28+5:30
मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र...
मुंबई - मराठा आरक्षण आंदोलन भडकल्यानंतर काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक आंदोलक तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा मोर्चाच्या आंदोलकांमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र आंदोलनादरम्यान, पोलिसांवर ह्ल्ला करणाऱ्यांची गय केली जाणार नाही."
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाच्या संघटनांनीही शांततामय मार्गाने त्याला सहकार्य करावे. तसेच मराठा समाजाच्या सर्व संघटनांशी चर्चा करण्यास मी तयार आहे. तसेच ज्यांनी मला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यांच्यासाठी मी भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणा संदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पुढच्या महिन्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.