पुराव्याआधारे मराठा आरक्षण शक्य
By admin | Published: February 10, 2017 05:13 AM2017-02-10T05:13:26+5:302017-02-10T05:13:26+5:30
मराठा आरक्षणासंदर्भात २७०० पानांचा सर्च अहवाल न्यायालयात सादर केला आहे. २७ फेब्रुवारीपासून त्याची रोज सुनावणी होणार...
बार्शी (जि. सोलापूर) : मराठा आरक्षणासंदर्भात २७०० पानांचा सर्च अहवाल न्यायालयात सादर केला आहे. २७ फेब्रुवारीपासून त्याची रोज सुनावणी होणार असून आपल्याकडे असलेल्या पुराव्यावरुन मराठा समाजाला निश्चित आरक्षण मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला़
बार्शीतील गांधी पुतळा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सरकारने सुरू केलेल्या योजनांची जंत्री मतदारांपुढे मांडली. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी अजून लोकांच्या मूलभूत गरज पूर्ण करता आलेल्या नाहीत. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरु केली असून २०१९ पर्यंत सर्वांना घरकुल मिळेल. राज्य शासनानेही दिनदयाळ घरकुल योजना सुरु केली आहे. शिक्षणाच्याबाबतीत महाराष्ट्र १८ व्या क्रमांकावर होता आता तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. गोरगरिबांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाची निम्मी फी, त्यांच्या राहण्याच्या व जेवणाच्या व्यवस्थेवरही खर्च करणार आहे. रोजगारांसाठी कौशल्य निर्मिती करण्याला सरकारचे प्राधान्य असून जिल्ह्यात १०० प्रशिक्षण केंद्र सुरु केली आहेत. याबरोबरच मुद्रा योजनेंतर्गत १० लाखांपर्यंतचे कर्ज नवउद्योजकांना विनातारण, विना जामीनदार दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)