न्यायालयातही मराठा आरक्षण टिकेल; मुख्यमंत्र्यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:43 AM2018-11-30T05:43:56+5:302018-11-30T05:44:11+5:30
मुख्यमंत्र्यांची लोकमतशी बातचीत; ऐतिहासिक निर्णयाने आनंदी
- यदु जोशी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील भव्य स्मारक आणि मराठा समाजाला आरक्षण हे आपल्या कारकीर्दीतील ऐतिहासिक निर्णय झाल्याने मी अतिशय आनंदी आहे, अशी भावना व्यक्त करतानाच, हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
मराठा आंदोलनाचा तुमच्यावर ताण होता का आणि मराठा आरक्षणाबाबत या काळात आपली नेमकी भावना काय होती, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, आंदोलन हिंसक झाले तेव्हा खूप व्यथित झालो होतो.
मराठा समाजाच्या भावना मी समजू शकत होतो. आरक्षण देण्याची प्रक्रिया, लागणारा कालावधी व ते टिकलेच पाहिजे यासाठी ठोस पावले उचलणे हेही महत्त्वाचे होते. गेल्या आॅगस्टमध्ये आंदोलनाला वेगळे वळण लागले, तेव्हा मी जाहीर केले होते की मी नोव्हेंबर २०१८ पूर्वी आरक्षण देणार आणि आज ते प्रत्यक्षात आले आहे.
हे आरक्षण न्यायालयात टिकेल या बाबत अनेक जण शंका उपस्थित करीत आहेत, याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनुसार संवैधानिक भूमिकेच्या आधारे आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यायालयातही मराठा आरक्षण टिकेल असा माझा विश्वास आहे.
आरक्षण द्यायचेच ही भूमिका होती
आरक्षण द्यायचेच आहे ही भूमिका स्पष्ट आणि प्रामाणिक होती. एखाद्या समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल आवश्यक असतो. तो मराठा समाजाबाबत आतापर्यंत तयारच करून घेण्यात आला नव्हता. ते काम आमच्या सरकारने केले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.