छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 12:55 PM2024-02-05T12:55:50+5:302024-02-05T12:58:57+5:30

छगन भुजबळ यांना सरकारची भूमिका मान्य नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून केली जात होती.

Maratha Reservation Chhagan Bhujbals resignation should not be accepted National OBC Federation Warning to cm Eknath Shinde | छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा... ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

NCP Chhagan Bhujbal ( Marathi News ) : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत राज्यभर रान पेटवलं आहे.  भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी एल्गार मेळाव्यांचं आयोजन केलं जात असून या मेळाव्यांतून मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या मागण्या मान्य करणाऱ्या राज्य सरकारविरोधातही हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे भुजबळ यांना सरकारची भूमिका मान्य नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी अहमदनगर इथं  नुकत्याच झालेल्या मेळाव्यात गौप्यस्फोट करत मी नोव्हेंबर महिन्यातच माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, असं सांगितलं. मात्र तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी अद्याप स्वीकारलेला नाही. भुजबळांच्या राजीनाम्यावरून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली असून भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांना इशारा देत बबनराव तायवाडे म्हणाले की, "मेळाव्यातून ओबीसी समाजाची सत्य बाजू मांडताना टीका होऊ नये, म्हणून छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी मराठा समाजाविरोधात कधीही भूमिका घेतली नाही. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, ही मागणी भुजबळ यांनी लावून धरली आहे. स्वतःच्या समाजाच्या रक्षणासाठी काम करताना कोणी टीका करत असेल तर, त्याला उत्तर द्यावंच लागेल. छगन भुजबळ यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर, ओबीसी समाज एकत्र होऊन त्यांचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरेल," असं तायवाडे यांनी म्हटलं आहे.

भर मेळाव्यात भुजबळांनी कोणता गौप्यस्फोट केला?

छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच अहमदनगर जिल्ह्यात ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यातून भुजबळांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत खळबळजनक गौप्यस्फोट केला. भुजबळ म्हणाले की, "सरकारमधील आणि विरोधी पक्षातील सगळे बोलतात की, तुम्ही राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. माझ्या सरकारमधीलही नेते बोलतात. काल-परवा एकजण बडबडला. या भुजबळाला कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाला बाहेर हाकला, असं म्हणाला. मला त्या सर्वांना विरोधी पक्ष, स्वपक्षातील, सरकारमधील सर्वांना सांगायचे आहे. १७ नोव्हेंबरला जालनातील अंबडला सभा झाली. मात्र १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो. मला लाथ मारण्याची गरज नाही. अडीच महिने मी शांत राहिलो, याची वाच्यता नको असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. लाथ मारायची गरज नाही. मी शेवटपर्यंत ओबीसीसाठी लढणार आहे," असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.
 

Web Title: Maratha Reservation Chhagan Bhujbals resignation should not be accepted National OBC Federation Warning to cm Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.