Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर नेत्यांचा बहिष्कार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 06:20 AM2018-08-02T06:20:38+5:302018-08-02T06:21:12+5:30
मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत बैठक बोलावली असली, तरी शाहू छत्रपती यांच्यासह नेतेमंडळी आणि समाजातील विचारवंतांनी पाठ फिरविली आहे.
कोल्हापूर : मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत बैठक बोलावली असली, तरी शाहू छत्रपती यांच्यासह नेतेमंडळी आणि समाजातील विचारवंतांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे कोंडी कशी फोडायची, याच्या विचारात सत्ताधारी आहेत. दुसरीकडे चर्चा कसली करता, निर्णय घ्या, असे शाहू छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावले आहे.
सकल मराठा समाजाने ९ आॅगस्टला क्रांतिदिनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील मान्यवरांशी चर्चा करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली. त्यासाठी शाहू छत्रपती, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांना निमंत्रित केले, पण शाहू छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांकडे नव्हे, तर मुख्यमंत्र्यांनी शाहू छत्रपतींकडे चर्चेसाठी यावे, अशी परखड भावना सकल मराठा समाजाने व्यक्त केल्याने त्यांनी बैठकीस न जाण्याचा निर्णय घेतला.
शाहू छत्रपती व डॉ. जयसिंगराव पवार हे ठिय्या आंदोलनस्थळी आले. कार्यकर्त्यांची मते त्यांनी जाणून घेतली. या वेळी सरकारने आतापर्यंत कसे फसविले, याचा पाढाच कार्यकर्त्यांनी वाचला.
प्रा. एन. डी. पाटील यांना तर विमान पाठवितो, परंतु बैठकीला या, असे साकडे घालण्यात आले, पण त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले.