Maratha reservation: आंदोलनात येणाऱ्या मंत्र्यांना उलट प्रश्न विचारू नका; संभाजीराजेंचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 06:35 AM2021-06-16T06:35:44+5:302021-06-16T06:36:26+5:30
कोल्हापुरात आज मूकमोर्चाने प्रारंभ; मंत्री, आमदारही राहणार उपस्थित
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांबाबतच्या लढ्यासाठी महाराष्ट्राला दिशादायक ठरणाऱ्या मूक आंदोलनाचा आज, बुधवारी कोल्हापुरातून प्रारंभ होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आंदोलनात सहभागी होणार आहेत. (Prakash Ambedkar's participation in the Maratha reservation agitation today.)
आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत आंदोलन होईल. त्यामध्ये जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार हे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. राज्यातील प्रमुख समन्वयक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले.
आंदोलनाच्या तयारीची खा. संभाजीराजे आणि संयोगिताराजे छत्रपती यांनी मंगळवारी सकाळी पाहणी केली. त्यानंतर मराठा समाजातील समन्वयकांची बैठक घेतली. कोरोनाच्या नियमांचे पालन करून हे आंदोलन होईल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
मी, समन्वयक कोणी बोलणार नाही
आपण केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील दोन मंत्री, बारा आमदार, दोन खासदार मूक आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांना सन्मान देऊन त्यांची भूमिका आपण समजून घ्यायची आहे.
त्यांना कोणीही उलटसुलट प्रश्न विचारायचा नाही. आपण मौन राखायचे. मी, समन्वयक कोणी बोलणार नसल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले.
बुधवारी मूक मोर्चा नाही, तर आंदोलन होणार आहे. त्यामुळे त्यासाठी केवळ समन्वयकांनी उपस्थित राहावे. गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
...तर लाँग मार्च होणार
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेबाबत राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून या मूक आंदोलनाच्या माध्यमातून फुंकले जाणार आहे.
राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे. जर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर जिल्हानिहाय मूक आंदोलनाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुणे येथील लाल महाल ते मुंबईतील विधान भवन असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे, असे खा. संभाजीराजे यांनी सांगितले.