Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आजपासून उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 04:44 AM2018-11-02T04:44:24+5:302018-11-02T06:56:04+5:30
मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची हाक देण्यात आली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची हाक देण्यात आली आहे. या वेळी काळ्या फिती, झेंडे लावून मराठा समाजातर्फे सरकारचा निषेध केला जाईल.
समन्वयक निशांत सकपाळ म्हणाले, आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना १५ नोव्हेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंददरम्यान ज्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्याची प्रमुख मागणी या वेळी केली जाईल. शिवाय सारथी संस्था, मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह व अन्य महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाईल. आंदोलनादरम्यान तरुण-तरुणींनी आत्महत्या केल्याने यंदा काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध करण्यात येईल.
दिवाळी पाडव्याला नवा पक्ष सकल मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा या दोन्ही गटांनी ‘मराठा क्रांती मोर्चा’ नावाने राजकीय पक्ष स्थापण्यास विरोध केला आहे. तरीही मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या नावाखाली नव्या पक्षाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी दुपारी पार पडली. या वेळी मराठा समाजाच्या नवीन राजकीय पक्षाची स्थापना दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबरला रायरेश्वर येथे करणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.