सरकारनं अतिशय चांगला तोडगा काढला, ओबीसींवरही अन्याय होणार नाही - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 03:44 PM2024-01-27T15:44:49+5:302024-01-27T15:45:46+5:30
कुठल्याही प्रकारे ओबीसीवर अन्याय होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे असं फडणवीसांनी सांगितले.
नागपूर - मराठा समाजासाठी अतिशय चांगला मार्ग निघून या आंदोलनाची सांगता झाली आहे. सरकारने या आरक्षणासाठी सकारात्मकता दाखवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा प्रश्न सुटलेला आहे. आम्ही सुरुवातीपासून जो काही मार्ग असेल तो कायदेशीर, संविधानाच्या चौकटीत काढावा लागेल असं सांगत होतो. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या रक्तांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देता येईल. आज जो मार्ग निघाला तो सरकारने आणि मनोज जरांगे पाटील यांनीही स्वीकारला. यातून मराठा समाजाचा प्रश्न सुटणार आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ज्या लोकांकडे कुठल्याच नोंदी नाहीत त्यांचाही प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. हा एक मोठा समाज आहे. त्यासाठी जे सर्वेक्षण हवं ते सुरू आहे. क्युरेटिव्ह पिटीशन यशस्वी व्हावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. पण काही कारणात्सव त्या अपेक्षित दिलासा मिळाला नाही. मात्र सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी भरून काढण्यासाठी या सर्वेक्षणाचा वापर होणार आहे. त्यासोबत ओबीसी समाजाच्या मनात आपल्यावर अन्याय होईल का अशी भावना होती. मात्र तोदेखील अन्याय आपण होऊ दिला नाही. राज्यातील सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. त्यातून हा चांगला प्रयत्न घडला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच कुठल्याही प्रकारे ओबीसीवर अन्याय होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. ज्यांच्याकडे नोंदी आणि पुरावा नाही अशांना प्रमाणपत्र दिली जात नाहीत. नोंदी मिळण्याची कार्यपद्धती सोपी करून हा मार्ग काढला आहे. त्यामुळे छगन भुजबळांचेही समाधान होईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ द्यायचा नाही ही आमची पहिल्यापासून भूमिका होती. त्याप्रकारे आम्ही अन्याय होऊ दिला नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अंतरवाली सराटीपासून राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या गुन्ह्यात पोलिसांवर हल्ले, घरे जाळणे, सरकारी बसेस पेटवणे यासारखे गुन्हे यांचा समावेश नाही. कारण हे गुन्हे कोर्टाच्या आदेशानुसार मागे घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे जे काही राजकीय गुन्हे आहेत ते मागे घेतले जातील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.