मराठा समाजाला कसं आरक्षण मिळणार? शिवनेरीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 10:54 AM2024-02-19T10:54:42+5:302024-02-19T10:55:38+5:30
Maratha Reservation: आज शिवजयंती सोहळ्यासाठी किल्ले शिवनेरील आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरीवरून मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण आणि सूचक विधान केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा आक्रमणपणे समोर आला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यामधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारनेही कुणबी नोंदी न आढळलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना स्वतंत्रपणे मराठा आरक्षण देण्याची तयारी केल्याचं वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शिवजयंती सोहळ्यासाठी किल्ले शिवनेरील आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरीवरून मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण आणि सूचक विधान केलं आहे.
शिवजयंती सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण काम करतोय. मराठा समाला आरक्षण देण्यासाठी उद्या आपण विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी उद्या हे खास अधिवेशन बोलावलेलं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
तसेच सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं हे सरकार आहे. तसेच राज्याचा सर्वांगिण विकास साधणारं हे सर्वसामान्यांच सरकार आहे, असे विधान एकनाथ शिंदे यांनी केलं.