मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा, वस्तुस्थितीत रूपांतर नाही - उदयनराजे भोसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 17:13 IST2022-08-08T17:10:44+5:302022-08-08T17:13:04+5:30
Udayanraje Bhosale : सोमवारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.

मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा, वस्तुस्थितीत रूपांतर नाही - उदयनराजे भोसले
मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी आता पुन्हा जोर धरु लागली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता सरकारला थेट ९ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मराठा आरक्षणाशिवाय निवडणुकांचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू असाही इशारा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.
सोमवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच, मराठा आरक्षणाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासंदर्भात फक्त घोषणा होत असतात, पण वस्तुस्थितीत रूपांतर होत नाही. सगळ्यांना आशा आहे की, शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल. कुठल्याही समाजाच्या लोकांवर अन्याय न होता, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे."
दुसरीकडे, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भेटीचा संबंध मंत्रिमंडळ विस्ताराशी लावला जात आहे. उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद हवे आहे का? अशा चर्चांनाही उधाण आले आहे.
उद्या शपथविधी होणार
उद्या सकाळी ११ वाजता राजभवन येथे शपथविधी होणार आहे. शिंदे गटातील ६ ते ७ आमदार उद्या शपथ घेतील, अशी शक्यता आहे. तर भाजपाचे ११ जण उद्या मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता राज्याच्या मंत्रिमंडळात असावा, अशी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित
गेल्या वर्षानुवर्षापासून मराठा आरक्षणाचा घोंगड हे भिजत पडलेले आहे. त्यासाठी राज्यभरात आंदोलने झाली आहेत. छत्रपती संभाजी राजे यांनीही त्यासाठी राज्यभर दौरे करत मराठा समाजाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. मुंबई ते दिल्ली अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. तसेच कोर्टातील लढाई लढली गेली आहे. मात्र तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न हा निकालात निघू शकलेला नाही.