…तर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आंदोलनाला बसू, मनोज जरांगे पाटलांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 01:20 PM2023-12-29T13:20:00+5:302023-12-29T13:21:03+5:30

Maratha Reservation: आंदोलनासाठी मुंबईत येणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच आम्ही आंदोलना बसू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Maratha Reservation: ...Let's protest at Devendra Fadnavis' door, warns Manoj Jarange PatIl | …तर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आंदोलनाला बसू, मनोज जरांगे पाटलांचा इशारा 

…तर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आंदोलनाला बसू, मनोज जरांगे पाटलांचा इशारा 

मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक आंदोलन करत आहेत. आता मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून अंतरवली सराटी येथून मुंबईपर्यंत मोर्चा काढून मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. तसेच या आंदोलनासाठी सुमारे ३ कोटी मराठे मुंबईत येतील असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच आंदोलनासाठी मुंबईत येणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच आम्ही आंदोलना बसू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आरक्षणासाठी मराठा समाजाकडून मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलनासाठी मुंबईत येणारी वाहनं अडवू नयेत, अडवल्यास ती वाहनं गृहमंत्र्यांच्या दारात उभी करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता. त्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, गृहमंत्री वाहनं अडवणार नाहीत. वाहनं अडवली तर आम्ही सामान कसं न्यायचं. आम्हाला खाण्यापिण्याचं सामान, कपडे, इतर वस्तू लागणार आहेत. वाहनं अडवली तर  कशा न्यायच्या, डोक्यावरून न्यायच्या का? आम्हाला तिथे राहुट्या नसतील तर उन थंडीपासून बचावासाठी ट्रॅक्टरमध्येच आसरा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ट्रॅक्टरबरोबर ट्रॉली लागणार आहे. ट्रॉलीमध्ये या वस्तू ठेवाव्या लागणार आहेत. पाऊस आला तर आमची त्या ट्रॉलीमध्येच झोपायची व्यवस्था होणार आहे. तिथे आम्हाला कुणी घर देणार आहे का? दिलं तरी कोट्यवधी लोकांना जागा मावणार आहे का? मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडवणार असाल. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असाल, गाड्या, ट्रॅक्टर अडवून जप्ती आणणार असाल तर तुम्ही अडवा बघू कसे अडवता ते. एकाही ट्रॅक्टरवाल्याने घाबरण्याचं कारण नाही. कारण आपण ते दैनंदिन गरजा भावण्यासाठी नेणार आहोत. कोण ट्रॅक्टर अडवते ते बघूयाच. सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे की कुणीही घाबरण्याचं कारण नाही. कुणाचाही ट्रॅक्टर जप्त होणार नाही. जर ट्रॅक्टर अडवलेच तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आम्ही सगळे जाऊन बसू. नागपूरच्या आणि मुंबईच्या त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलना बसू. देवेंद्र फडणवीस यांच्या दारातच जाऊन बसायचं. करोडोंच्या संख्येने जाऊन बसायचं उठायचंच नाही. ट्रॅक्टर अडवाच तुम्ही. कसे गुन्हे दाखल करता, तेच बघूया, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

तसेच मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण होणार आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळतील. हे आंदोलन शांततामय आणि लोकशाही मार्गाने होणार आहे. त्यामुळे आम्हाला परवानगी द्यावीच लागेल. परवानगी न मिळाल्यास या देशात कायदा, नियम आणि लोकशाहीच राहिली नाही, असा त्याचा अर्थ होईल, असेही जरांगे पाटील म्हणाले.

मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठीची व्यवस्था पाहण्यासाठी आमचं शिष्टमंडळ गेले आहे. आंदोलकांची संख्या पाहता आम्हाला अनेक मैदानं लागणार आहेत. तसेच मराठा बांधवांमध्ये मतभेद असलीत नसतील माहिती नाही. पण सर्व मराठ्यांनी मतभेद सोडून गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून एकत्र येऊन साथ द्यावी, सोबत यावं, अशी विनंती आम्ही मुंबईतील मराठा बांधवाना केली आहे, असेही जरांगे पाटील यांनी सांगितलं. 

Read in English

Web Title: Maratha Reservation: ...Let's protest at Devendra Fadnavis' door, warns Manoj Jarange PatIl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.