जरांगे पाटलांची मोठी घोषणा: या ३ मागण्या मान्य करा, गुलाल उधळायला येतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 03:26 PM2024-01-26T15:26:28+5:302024-01-26T16:24:06+5:30

अर्जच नाही केला तर प्रमाणपत्र मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही अर्ज करायला सुरुवात करा, असं आवाहन जरांगे पाटलांनी समाजबांधवांना केलं आहे.

maratha reservation manoj jarange patil big announcement in vashi | जरांगे पाटलांची मोठी घोषणा: या ३ मागण्या मान्य करा, गुलाल उधळायला येतो!

जरांगे पाटलांची मोठी घोषणा: या ३ मागण्या मान्य करा, गुलाल उधळायला येतो!

Maratha Reservation ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेनंतर या चर्चेचा तपशील स्वत:  वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील भाषणात मांडला. तसंच राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे. "शासनाच्या वतीने सकाळी आपल्यासोबत चर्चा झाली. आपण आपल्या मागण्यांसाठी मुंबईपर्यंत आलो आहोत. जातीच्या पदरात गुलाल टाकण्यासाठी आपण इथं आलो आहोत. सरकारकडून मंत्री आले नाहीत, मात्र सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे हे सारासार निर्णय घेऊन आले. सरकारने त्यांची भूमिका आपल्यासमोर मांडली. ५४ लाख कुणबी नोंद सापडलेल्यांना प्रमाणपत्र द्या, अशी आपली मागणी होती. दुसरी मागणी होती की या नोंदींची माहिती ग्रामपंचायतीसमोर लावा. सरकारने आता नोंदी मिळालेल्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी आपली मागणी होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. वंशावळ जुळवणीसाठी समिती जाहीर करण्यात आली आहे. अर्जच नाही केला तर प्रमाणपत्र मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही अर्ज करायला सुरुवात करा.  ५४ लाख कुणबी नोंदींपैकी ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिल्याचं सरकारने सांगितलंय," असं जरांगे पाटील म्हणाले. 

"कुणबी नोंद सापडलेल्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी होती. सरकारने ड्राफ्ट तयार केलाय, पण मला आज रात्रीपर्यंत अध्यादेश हवा आहे. आंतरवालीसह राज्यातील मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्या आणि हे गुन्हे मागे घेत असल्याचं पत्र मला द्या.  मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकरभरतीतील मराठ्यांच्या जागा रिक्त ठेवा," अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. तसंच आज सकाळी ११ वाजल्यापासून माझं उपोषण सुरू झालंय," असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

दरम्यान, तुम्ही मागण्या मान्य केल्या तर गुलाल उधळायला आझाद मैदानात येणार आणि नाही मान्य केल्या तर उपोषण करायला येणार, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

Web Title: maratha reservation manoj jarange patil big announcement in vashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.