मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 09:41 PM2024-06-03T21:41:13+5:302024-06-03T21:41:57+5:30

उपोषणामुळे जातीय सलोखा बिघडत असल्याचं सांगत जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी काही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती.

Maratha Reservation Manoj Jarange Patil changes date of fast The reason behind the decision was also told | मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!

मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशीच आपण पुन्हा एकदा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती. मात्र जरांगे पाटील यांच्या या निर्णयाला अंतरवाली सराटीतूनच विरोध झाला आणि उपसरपंचासह अन्य काही गावकऱ्यांनी जरांगे यांच्या उपोषणामुळे जातीय सलोखा बिघडत असल्याचं सांगत जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. अशातच आता मनोज जरांगे यांनी उपोषणाबाबत महत्त्वाची घोषणा केली असून उद्या उपोषण न करता ८ जूनपासून उपोषण करण्यात येईल, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

काही फितूर लोकांनी केलेल्या विरोधामुळे मी उपोषण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला नसून आचारसंहितेच्या नावाखाली मराठा समाजातील तरुणांवर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण मनोज जरांगे यांनी दिलं आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, यासाठी शासनाच्या स्तरावर काही पुढाकार घेतला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

उपोषणाला विरोध करणाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय?

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाचा ४ जून रोजी उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी आणि आसपासच्या भागातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या कारणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. अंतरवाली सराटीमधून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर उपसरपंच आणि पाच ग्रामपंचायत सदस्यांसह एकूण ७० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. हे आंदोलन भरकटत चालले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान, गावातील जातीय सलोखा बिघडला होता. लोक एकमेकांसोबत बोलत नाहीत, असा दावा जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी केला आहे. 

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. जरांगे-पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जनआक्रोश आंदोलन केले होते. त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये त्यांनी उपोषण केले होते.   

Web Title: Maratha Reservation Manoj Jarange Patil changes date of fast The reason behind the decision was also told

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.