"आता पाणी पितोय, पण...", आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगेंनी घेतला पाण्याचा घोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 08:33 PM2023-10-29T20:33:45+5:302023-10-29T20:34:49+5:30
खूपच विनंती केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पाण्याचा एक घोट घेतला. पण यापुढे काहीच घेणार नाही, असा इशारा देखील मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
जालना : आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसलेले आहेत. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे त्यांनी निदान पाणी तरी घ्यावं, अशी खूपच विनंती त्याठिकाणी उपस्थित आंदोलकांनी केली. या आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगे-पाटील यांनी पाण्याचा एक घोट घेतला. पण, आता पाणी पितोय पुन्हा पिणार नाही, असा इशारा यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या पाच दिवसात त्यांनी अन्नच काय पाणीही घेतलं नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांच्या पोटात दुखू लागले आहे. पण तरीही जरांगे पाटील उपोषण करत आहेत. वैद्यकीय उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिला आहे. बोलताना त्यांना धाप लागत आहे. त्यामुळे त्यांना निदान पाणी तरी घ्यावं अशी विनंती हे आंदोलक करत होते. खूपच विनंती केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पाण्याचा एक घोट घेतला. पण यापुढे काहीच घेणार नाही, असा इशारा देखील मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
तुमच्या विनंतीचा मी मान ठेवतो. मी पाण्याचा घोट घेतो. तुमची माया मी लोटून लावत नाही. पण पाणी पिऊन आणि सलाईन लावून आपल्याच लेकरांचा घात होऊ शकतो. आपल्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे. कोणाला तरी एकाला जीवाची बाजी लावून लढावे लागेल. मला माझ्या वेदना माहिती आहेत. त्यामुळे तुम्ही भावनिक होऊ नका. मी माझ्या उपोषणावर ठाम राहील. उपोषण सुरूच राहील, असेही मनोज जरांगे- पाटील यांनी यावेळी म्हटले.
("माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल", मनोज जरांगेंचा इशारा)
दरम्यान, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. यावरून मनोज जरांगे-पाटील यांनी आमदार आणि खासदारांना राजीनामा न देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, राजीनामे देऊन आपलीच संख्या कमी होईल. राजीनामे देण्या पेक्षा एकत्र या. मुंबईत बसून सरकारला वेठीस धरा. राजीनामे देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे कूच करा. समाज तुम्हाला विसरणार नाही.
दुसऱ्यांदा पाणी प्यायले
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांना भेटायला छत्रपती संभाजीराजे आले होते. संभाजीराजे यांनी जरांगे पाटील यांना पाणी घेण्याचा आग्रह धरला होता. कोल्हापूरच्या गादीचा मान आणि छत्रपतीच्या घराण्याचा मान म्हणून त्यांनी पाण्याचा घोट घेतला. त्यानंतर त्यांनी पाण्याच्या थेंबालाही हात लावला नव्हता. थेट आज समाजाच्या आग्रहास्तव त्यांनी पाणी घेतले.