जरांगेंची मुंबईकडे कूच; मुख्यमंत्री 'अलर्ट मोड'वर; आरक्षणाबाबत आश्वस्त करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 04:32 PM2024-01-25T16:32:17+5:302024-01-25T16:34:23+5:30
मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारं टिकणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
CM Eknath Shinde ( Marathi News ) : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आज झालेली बैठकही निष्फळ झाली असून आम्ही मुंबईला जाणारच, अशी ठाम भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाने सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन केलं आहे. तसंच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
हजारो आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील हे आता लोणावळ्याहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आंदोलक लवकरच मुंबईत धडकणार असून जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, "सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. आंदोलकांच्या मागणीप्रमाणे आम्ही आश्वासन न देता थेट ओबीसींप्रमाणे ज्या सुविधा मराठा समाजाला देणं आवश्यक आहे त्या सुविधा देण्याचं काम करत आहोत. जरांगे पाटलांशी होत असलेल्या चर्चा सकारात्मक आहेत. मराठा समाजाला ज्या सोई-सुविधा द्यायच्या आहेत त्यामध्ये सरकार अजिबात आखडता हात घेणार नाही. तसंच मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारं टिकणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे," असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
काय आहे जरांगेंचा आरोप?
सरकारच्या शिष्टमंडळाकडून सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली जात आहे. मात्र या चर्चेतून अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. "आमच्या ज्या मागण्या आधी होत्या त्या अजूनही कायम आहेत. सरकार फक्त मागण्या घेऊन जातं, पण त्यातील काही शब्द काढून परत कागदे घेऊन येतात. त्यामुळे तोडगा निघत नाही," असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या हजारो आंदोलक राजधानी मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत पोहोचण्याआधी सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये एकमत होऊन आंदोलनावर तोडगा निघणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.