मनोज जरांगे पाटलांनी मुंबईचं आंदोलन स्थगित करावं; पुरुषोत्तम खेडेकर काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 07:19 PM2024-01-17T19:19:49+5:302024-01-17T19:20:53+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटलांची मागणी संविधानिक आहे असं त्यांनी सांगितले.
हिंगोली - मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला वेळ द्यावा, संवाद साधावा आणि मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटलांना विश्वास द्यावा जे काही खरे असेल ते सांगावे. २० तारखेपासून जे काही चलो मुंबई आंदोलन करताय ते स्थगित करावे अथवा पुढे ढकलावे असा सल्ला मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिला आहे.
पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटलांची मागणी संविधानिक आहे. आंदोलनात काही भावनिक प्रकार होतायेत. राज्य सरकारलाही काही मर्यादा असतात. राज्य सरकार कुटुंब किंवा व्यक्तीसारखं काम करत नाही. एकनाथ शिंदेंवर त्यांनी विश्वास ठेवला आहे. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील असं त्यांना वाटतंय. त्यामुळे त्यांनी वेळ दिला पाहिजे. मराठवाड्यातील आणि अन्य राज्यातील जिल्ह्यात ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्या सापडल्या आहेत. सरसकट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा हे राज्य सरकारच्या अख्यारित्य येत नाही. तर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सल्ल्यानुसार त्यांना तो निर्णय घ्यावा लागेल असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत गेल्या ३५ वर्षापासून मराठा सेवा संघ कार्यरत आहे. मात्र अलीकडे तरुण आणि महिलांचा सहभाग आणि सक्रीय काम दिसत नाही. चळवळीत शिथिलता आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांशी संपर्क साधावा. चर्चा करावी. तरुण आणि महिलांशी बोलावं. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयावर चर्चा केली जाईल. काम करणाऱ्या लोकांची समर्पिक भावना कमी झालीय. आता नवीन पिढीने संघटनेत कार्यरत व्हावे. आमची काय चूक हे शोधून मार्ग काढू असं सांगत खेडेकर यांनी राज्यभरात संवाद दौरा करणार असल्याचे घोषित केले.
संभाजी ब्रिगेडला ठाकरेंकडून हव्या २ जागा
संभाजी ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय युती झाली आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या वाट्याला काही जागा याव्यात अशी मागणी आम्ही केली आहे. आम्ही थेट महाविकास आघाडीचे घटक नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यातील काही जागा आम्हाला द्याव्यात ही चर्चा करण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली. किमान हिंगोली, बुलढाणा या दोन लोकसभा जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी आम्ही केली आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. चर्चा सकारात्मक झाली आहे. हिंगोलीत आमचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे निवडणूक लढवतील. तशी आम्ही त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. बुलढाणा जागेबाबत अद्याप निर्णय झाला नाही अशी माहितीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली.