तुम्ही ज्ञान पाजळायची गरज नाही; मनोज जरांगे मंत्री तानाजी सावंतांवर का संतापले?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 07:36 PM2023-11-08T19:36:24+5:302023-11-08T19:36:41+5:30
आम्ही पूर्वीपासून ओबीसीत आहोत, कित्येक पुरावे आहेत, जास्तीचे आरक्षण खात होते ते बोलतायेत असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.
जालना – गोरगरिबांच्या घरात जाऊन बघा, तुम्हाला मराठा समाजाची वेदना काय माहिती?, तुम्ही ज्ञान पाजळण्याची गरज नाही, मराठ्यांना वेड्यात काढून स्वत: खूप शहाणे हे दाखवण्याची गरज नाही. मोघम गप्पा मारण्यापेक्षा आरक्षण का टिकलं नाही हे विचारा, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? समाजाची ज्यांना जाण नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचे, वेळ आल्यावर आरक्षण कसं मिळतंय ते सांगू अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर संताप व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गोरगरिबांची टिंगळटवाळी करणारे हे लोक, पैसा खूप आहे, मराठ्यांच्या जीवावर सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. त्यांच्याकडे भरपूर आहे. तुमची मस्ती आम्हाला दाखवू नका. श्रीमंत नेत्यांना गरीब मराठ्यांची व्यथा कळणार नाही. गोरगरिबांच्या अडचणी तुम्हाला माहिती नाही. आरक्षण कसं द्यायचे हे सरकारला कळते, टिकणारे द्यायचे की नाही, मराठ्यांनाही कळते. श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांपाशी दाखवू नका असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही टीका करायची म्हणून करत नाही. जी सत्य परिस्थिती आहे, बीडमध्ये त्यांच्याच लोकांनी जाळपोळ, तोडफोड केली आणि मराठ्यांच्या पोरांवर डाग लावला. विनाकारण पोलिसांनी गरीब मराठा पोरांना मारले हे सत्य आहे. मी सगळे पुरावे देईन, आम्ही पूर्वीपासून ओबीसीत आहोत, कित्येक पुरावे आहेत, जास्तीचे आरक्षण खात होते ते बोलतायेत, पुरावे सापडलेत. त्यामुळे ओबीसींच्या गोरगरिबांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आम्ही ओबीसीतच आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, आम्ही जाळपोळीचं समर्थन केले नाही. जे चुकीचे आहे ते चूकच, परंतु शांततेच्या आंदोलनाला डाग लावायचा होता म्हणून मराठा गोरगरिबांच्या पोरांना त्रास दिला जातो, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. १९९४ पासून आमचे आरक्षण घेतलं कुणी? आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला आता मिळतंय, ओबीसी नेत्यांनी खोटे बोलून राजकीय पोळी भाजली, मराठा आणि सामान्य ओबीसीत दुरावा निर्माण करण्याचे काम राजकीय नेत्यांनी केली. ४०-५० वर्ष गोरगरीब मराठा पोरांचे वाटोळे या नेत्यांनी केले असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
काय म्हणाले होते तानाजी सावंत?
जर तर भूमिकेवर बोलायला मी पचांग घेऊन बसलो नाही. हा आरक्षणाचा लढा आहे, त्यात कायदेशीर बाबी आहेत. सरकारला दमछाक करून तुम्ही आत्ताच्या आता आरक्षण द्या असं म्हणाल, परंतु सरकारच्या दृष्टीने कायद्याच्या चौकटीत बसून जे काही मिळेल ते टिकलेही पाहिजे. आंदोलनाचे नेतृत्व कोण करतंय? आंदोलन का करतायेत? आरक्षण रद्द झाल्यानंतर वर्ष-दोन वर्ष कुणीही काही बोललं नव्हते. आरक्षणाचे वादळ अचानक का उठलं? आत्महत्या हे आरक्षणावरील तोडगा नाही. हायकोर्टात टिकलेले आरक्षण का गेले? त्या सरकारला आरक्षण का टिकवता आले नाही असा सवाल तानाजी सावंत यांनी केला होता.