Maratha Reservation : आरक्षणावर चर्चेसाठी पुण्यात आज मराठा आरक्षण परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 08:25 AM2018-08-05T08:25:46+5:302018-08-05T08:26:36+5:30
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकीकडे रस्त्यावरील आंदोलन अधिकाधिक तीव्र होत आहे. तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीला विचारमंथन करण्यासाठी राज्यात विविध बैठकांचेही आयोजन होत आहे.
पुणे - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकीकडे रस्त्यावरील आंदोलन अधिकाधिक तीव्र होत आहे. तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीला विचारमंथन करण्यासाठी राज्यात विविध बैठकांचेही आयोजन होत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी रविवारी पुण्यात मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला मराठा समाजातील समन्वयक, संशोधक, तज्ज्ञ, अभ्यासक आदी मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
रविवारी दुपारी पुण्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. तसेच 9 ऑगस्टला नियोजित असलेल्या आंदोलनाबाबत नियोजन करण्यासाठी मुंबईत मराठा संघटनांची बैठक होणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणावरून राज्यात आंदोलन आणि आत्महत्यांचे सत्रही सुरूच आहे. तुर्भे येथे राहणाऱ्या माथाडी कामगार तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीवरून तो कर्जबाजारी होता, हे समोर आले आहे. त्याबरोबरच, सरकार मराठा आरक्षण देत नसल्याचीही नाराजी त्याने चिठ्ठीमध्ये व्यक्त केली.
तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या विविध भागात लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. 9 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा, अन्यथा तोंडाला काळं फासू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं समाजातील आमदार, खासदारांना देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना इशारा देण्यात आला आहे.