मनोज जरांगेंची पदयात्रा मुंबईच्या वेशीवर, नवी मुंबईत मराठ्यांचे भगवे वादळ दाखल, आजचा दिवस निर्णायक!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 08:04 AM2024-01-26T08:04:15+5:302024-01-26T08:06:47+5:30
सध्या मनोज जरांगे पाटील हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांच्या सोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत.
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण पदयात्रा नवी मुंबईत दाखल झाली असून सकाळी दहाच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.
सध्या मनोज जरांगे पाटील हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांच्या सोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत. माथाडी भवन चौकातील सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी रात्री एक वाजताही हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी ढोल हलगीच्या तालावर अनेकांनी ठेका धरला होता. भगवे झेंडे फडकावत व घोषणा देत एकमेकांचा उत्साह वाढविला जात होता. मनोज जरांगे पाटील यांचे सकाळी 5.30 वाजता आगमन झाले. वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.
याचबरोबर, आज मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाचा निर्णायक दिवस मानला जात आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदारपणे प्रयत्न सुरु आहे. माथाडी भवनमध्ये त्यांची सरकारच्या शिष्टमंडळाशी भेट होण्याची शक्यता आहे. तसेच, सकाळी बाजार समितीमध्ये ध्वजवंदन झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे, हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावला आहे. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आंदोलनाबाबत नोटीस दिली असली, तरी आम्ही हौस म्हणून मुंबईला निघालेलो नाही, आता आरक्षण घेऊनच माघारी फिरणार असा निर्धार जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
निवासाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा
मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईत येणाऱ्या आंदोलकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी नवी मुंबईतील सकल मराठा समाजासह विविध संस्थानी देखील पुढाकार घेतला. नेरुळमधील तेरणा शाळा आणी वैद्यकीय महाविद्यालयात नवी मुंबई सकल मराठा समाजाच्या वतीने 15 हजार आंदोलकांची राहण्याची आणी जेवणाची सोय करण्यात आली. तेरणा व्यवस्थापनाच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालय, शाळेची इमारत, मैदान आंदोलकांना वापरण्यासाठी दिले असून तेरणा रुग्णालयाच्या वतीने मोफत आरोग्य कॅम्प आणी रुग्णवाहीका उपलब्ध करून दिल्या.
एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी दुमदुमली नवी मुंबई
राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा आंदोलन नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मध्यरात्री बारानंतरही ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो, दुचाकीवरून आंदोलक बाजार समितीत दाखल होत होते. एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी संपूर्ण नवी मुंबई परिसर दुमदुमला होता. पामबीच रोडवर नेरूळ, सारसो॓ळे, सानपाडा चौकात नवी मुंबईतील शेकडो नागरिकांनी आंदोलकांचे स्वागत केले. रोडवर ठिकठिकाणी माहिती देण्यासाठी स्वयंसेवक तैनात होते. एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.