आम्ही मराठा समाजासोबत आहोत बोलणारे सहकुटुंब फिरायला गेलेत; उदय सामंतांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 04:24 PM2023-11-03T16:24:38+5:302023-11-03T16:25:07+5:30
मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की मराठा समाजातील तरुणांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घाव्यात तर त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिलेल्या आहेत
मुंबई - काही लोक नेहमी बोलत होते आम्ही मराठा समाजासोबत आहोत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळाले पाहिजे तेच लोक काल सहकुटुंब फिरायला गेले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते, महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन आणि उपोषण सुरू होते तरी ही हेच लोक सह परिवार आम्ही ज्या विमानतळावर उतरलो त्याच विमानतळावरून फिरवायला गेले असा टोला मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे त्यासाठी सरकारने याआधीच काम सुरू केलेले आहे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केलेले आहे. शिंदे समिती या विषयावर गंभीरपणे जोमाने आणि चांगले काम करत आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्या आहेत ही चांगली गोष्ट आहे आणखीन मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडतील त्यासाठी काम सुरू केलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात आणि त्यासाठी ते प्रामाणिकपणे सकारात्मक काम करत आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच काल मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले म्हणून अनेक लोकांचे वाईट मनसुबे उधळून गेले. मराठा समाजाने २०१४ ते २०१९ मध्ये लाखोंच्या संख्येने शांतपणे संयमाने महाराष्ट्रात मोर्चे काढले कधीच हिंसाचार केला नाही परंतु यावेळेस काही लोकांनी समाजकंटकांना घेऊन हिंसाचार घडवून सरकारला आणि मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आवाहन केले होते की शांत रहा जाळपोळ आणि तोडफोड करू नका तरी सुध्दा काही ठिकाणी अनुचित प्रकार घडले. मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की मराठा समाजातील तरुणांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घाव्यात तर त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिलेल्या आहेत. पहिल्या आंदोलनाच्या केसेस येत्या १५ दिवसात मागे घेतल्या जातील आणि बाकीच्या महिन्याभरात सर्व केसेस मागे घेतले जातील. शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई द्यावी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४४१ शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई देण्यात येणार, असे सांगितलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने लेखी स्वरूपात नोंदी करून तसे काम सुरू केलेले आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं.
दरम्यान, मी कालच्या शिष्ट मंडळात होतो आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्ही सखोल चर्चा केली. त्यांना आम्ही विश्वास दिला की आमचे सरकार मराठा समाजाला कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण देणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, असा आम्ही त्यांना ठाम विश्वास दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे. या दोन महिन्यात सरकार अधिक मनुष्यबळ वापरून अधिक वेगाने काम करणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.