Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची गरज - हर्षवर्धन जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 11:40 AM2018-08-01T11:40:06+5:302018-08-01T13:14:32+5:30

Maratha Reservation : छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आहे.

Maratha Reservation : Need of Independent Political Party for Maratha Community - Harshavardhan Jadhav | Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची गरज - हर्षवर्धन जाधव

Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची गरज - हर्षवर्धन जाधव

googlenewsNext

औरंगाबाद - छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे मत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मांडले आहे. तसेच मराठा आरक्षणावर बोलू नका, असा फोन बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरून मला आला आहे. माझ्याच पक्षाकडून माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी क्रांतीचौक येथील ठिय्या आंदोलनात पत्रकार परिषदेत बोलताना केला. 

जाधव म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठल्याही राजकीय पक्षाला रस नाही. आपल्याला फक्त फिरविले जात आहे. आता सर्व राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर बसण्याची गरज आहे, तशी भूमिका कुठलाही पक्ष घेण्यास तयार नाही. माणसे मरत असताना माझा पक्ष मला म्हणतो, आरक्षणाबाबत बोलायचे नाही. याला तोडगा एकच आहे, आपले छत्रपती शासन आणणे. मराठा बांधवांनी यावर विचार करावा. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजासाठी पक्ष स्थापन करणे गरज असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. आपली माणसे निवडून आणावी लागतील. 

"विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेऊनच अध्यादेश काढता येईल. त्याला तीन महिने लागतील. दोन वर्षांपासून समाजाचे मोर्चे निघत असताना आता तीन महिने कशासाठी लागत आहेत. याचा अर्थ असा आहे की, आरक्षण द्यायचे नाही. वेळकाढू धोरण सरकार राबवीत आहे. मराठा युवक नैराश्यात येत आहेत. समाजाने नैराश्यात जाण्याऐवजी स्वतंत्र राजकीय पक्ष काढून लढले पाहिजे." असा सल्ला जाधव यांनी दिला. 

पक्षप्रमुखांनीही फोन घेतला नाही

शिवसेनेचे गटनेते तथा मंत्री शिंदे यांनी फोन करून आरक्षणावर न बोलण्याची ताकीद दिली, ही बाब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली काय, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पक्षप्रमुखांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही. त्यांची भेटही झाली नाही. मुख्यमंत्र्यांकडूनही काही दाद मिळाली नसल्याचे आ.जाधव म्हणाले. त्यांच्या विधानामुळे शिवसेनेची मराठा आरक्षणाच्या प्रकरणात मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आ.जाधव म्हणाले, छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली. 

Web Title: Maratha Reservation : Need of Independent Political Party for Maratha Community - Harshavardhan Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.