“...तर मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशी यात्रेची शासकीय पूजा करू देणार नाही”; कुणी दिला इशारा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 04:09 PM2023-04-22T16:09:48+5:302023-04-22T16:11:07+5:30
Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटळल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे सांगितले जात आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली फेरविचार याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. यानंतर आता नवीन आयोग स्थापन करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यातच आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून, मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशी यात्रेची शासकीय महापूजा करू न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. आता राज्यात पुन्हा संघर्ष पाहिला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मराठा समाजाने आता थेट तुळजापूर ते मंत्रालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. महामोर्चाच्या निमित्ताने एक मराठा, लाख मराठा ही घोषणा पुन्हा एकदा घुमणार असल्याचे म्हटले जात आहे.
केंद्र आणि राज्य सरकारचा पुतळा जाळून निषेध
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाज आक्रमक झाला आहे. सरकारचा निषेध म्हणून मराठा समाजाच्या वतीने पंढरपुरमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला आहे. आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवला अन्यथा मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय पूजा करू देणार नाही असा पवित्रा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाची याचिका राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडल्यामुळेच फेटाळण्यात आल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे. समाजाच्या वतीने तुळजापूर ते मुंबईपर्यंत मोर्चा छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत एल्गार पुकारणार आहे. एक महिनाभर मराठा समाजाचे कार्यकर्ते तुळजापूर ते मुंबई मंत्रालय पायी यात्रा काढणार आहेत. ०६ जूनला मुंबईमधील आझाद मैदानावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करणार असल्याची भूमिका मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यासंदर्भात टीव्ही९ ने वृत्त दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"