‘मराठा आरक्षणाबाबत तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे कुणालाही परवडणार नाही,’ संभाजीराजेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 07:34 PM2024-01-01T19:34:39+5:302024-01-01T19:35:24+5:30
Maratha Reservation: गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाबाबत आग्रही राहिलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी टिकणारे आरक्षण म्हणजे नेमके काय? असा प्रश्न उपस्थित करत मराठा आरक्षणाबाबत केवळ तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे आता कुणालाही परवडणार नाही, असा इशारा दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. त्याचदरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाबाबत आग्रही राहिलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी टिकणारे आरक्षण म्हणजे नेमके काय? असा प्रश्न उपस्थित करत मराठा आरक्षणाबाबत केवळ तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे आता कुणालाही परवडणार नाही, असा इशारा दिला आहे.
संभाजीराजे छत्रपती सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, २०२३ हे वर्ष संघर्षाचे होते. आरक्षणासाठी अनेक मराठा तरूणांनी आत्महत्या केल्या. मात्र अजूनही राज्यकर्ते समाजाची दिशाभूल करत आहेत का, असा प्रश्न पडतो. सरकार म्हणते कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे आरक्षण देणार. कुणाला धक्का न लावता देणार याचा अर्थ ५०% च्या वर देणार, पण यापूर्वी दोनदा असे आरक्षण टिकलेले नाही, मग नेमके आरक्षण देणार कसे ? टिकणारे आरक्षण म्हणजे नेमके काय ? हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच किमान येत्या वर्षाच्या सुरूवातीला तरी आपल्या संघर्षाला यश मिळेल अशी अपेक्षा मराठा समाज बाळगून आहे. त्यामुळे केवळ तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे आता कुणालाही परवडणार नाही, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.