आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 05:35 PM2023-11-05T17:35:48+5:302023-11-05T17:36:26+5:30
एखादा न्याय मिळवायचा असेल तर सातत्य ठेवायला लागते. आमच्यावर खूप अन्याय झालाय ही खदखद आहे असं जरांगे पीटाल यांनी सांगितले.
जालना – माझ्या तब्येतीची काळजी करण्याची आवश्यकता नाही. तब्येत ठणठणीत आहे. १ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील गावोगावी साखळी उपोषण सुरू करावं. आपल्या आरक्षणाचा आणि लेकरांच्या न्यायाचा दिवस जवळ आलाय. लेकरांच्या भविष्याचा विचार डोक्यात ठेवायचा आहे. शेती आणि आरक्षण दोन्हीही कामे आपल्याला करायची आहे. न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवायचे नाही. आमरण उपोषण स्थगित केले तरी अंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरू आहे. हे उपोषण आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांनी उग्र आंदोलन करू नये, आत्महत्या करू नये. खांद्याला खांदा लावून आरक्षणासाठी लढायचे आहे. लवकरच मी महाराष्ट्र दौरा करणार असून समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी जाणार आहे. २४ डिसेंबरपर्यंत गावागावातील मराठा समाज जागरूक ठेवायचा आहे. माझी तब्येत बरी आहे. डॉक्टरांनी युद्धपातळीवर उपचार करून मला ठणठणीत करून टाकलं असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच एखादा न्याय मिळवायचा असेल तर सातत्य ठेवायला लागते. आमच्यावर खूप अन्याय झालाय ही खदखद आहे. पिढ्यानपिढ्या अन्याय झाला आहे. आम्हाला शेती आणि लेकरांचे भविष्यही बघायचे आहे. राज्यात तिन्हीही समिती आरक्षणासाठी काम करतंय. केवळ मराठवाड्यात नाही तर राज्यभरात समितीला काम करायला भाग पाडले. एक भाऊ नाराज नाही करायचा. त्यामुळे विभागवार वैगेरे नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आमच्या जातीवर हक्काच्या आरक्षणावर प्रचंड अन्याय झाला, आता यापुढे होऊ द्यायचे नाही. अहवाल राज्याचा गेल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. निजामकालीन दस्तावेज जमा करून मराठवाड्यासह राज्यात आरक्षण द्या अशी आमची मागणी होती. सरकारही ताकदीने काम करायला लागले आहे. बाबासाहेबांचे विचार घेतल्याशिवाय कुठल्याही वंचित घटकांना न्याय मिळणार नाही. आरक्षणाचा दिवस जवळ आलेला असताना आत्महत्या करतायेत, मग त्या आरक्षणाचं करायचे काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारले.
तरुणांनो, आत्महत्या करू नका
सरकार रात्रंदिवस काम करतंय, प्रत्येक जिल्ह्यात कक्ष उभा राहिला आहे. जिल्हाधिकारी कामाला लावलेत. दिवसातून २-३ बैठका मराठा आरक्षणावर होतायेत. त्यामुळे निराश न होता तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. मराठ्यांच्या एकजुटीचा विजय होतोय. मनोज जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून लढायचे. एकाही भावाने आत्महत्या करायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या तरुणांना केले आहे.