मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 03:07 PM2024-06-03T15:07:38+5:302024-06-03T15:09:45+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान उठवणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र ४ जूनपासून सुरू होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणा आंदोलनाला अंतरवाली सराटीमधूनच विरोध होत असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान उठवणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र ४ जूनपासून सुरू होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणा आंदोलनाला अंतरवाली सराटीमधूनच विरोध होत असल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ, नका असं पत्र अंतरवाली सराटीमधील काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाचा ४ जून रोजी उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी आणि आसपासच्या भागातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या कारणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीमधून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर उपसरपंच आणि पाच ग्रामपंचायत सदस्यांसह एकूण ७० ग्रामस्थांच्या सह्या आहेत.हे आंदोलन भरकटत चालले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान, गावातील जातीय सलोखा बिघडला होता. लोक एकमेकांश बोलत नाही आहेत, असा दावा जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार आहेत. जरांगे-पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जनआक्रोश आंदोलन केले होते. त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये त्यांनी उपोषणे केली. आता अंतरवाली सराटी येथे ४ जूनपासून उपोषण होणार असून येणाऱ्या काही दिवसात पावसाळाही सुरू होणार आहे. त्यामुळे उपोषणस्थळी पत्र्याचा मंडप टाकण्यात आला आहे.