Maratha Reservation: ‘मराठा आरक्षणाचा वटहुकूम आजही काढता येईल, पण...’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 06:05 AM2018-08-01T06:05:00+5:302018-08-01T06:05:14+5:30
मनात आणले तर मराठा आरक्षणासाठी आज वटहुकूम काढता येईल. पण ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करेल.
मुंबई : मनात आणले तर मराठा आरक्षणासाठी आज वटहुकूम काढता येईल. पण ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करेल. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर महिनाभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला.
‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनीच मराठा समाजाला प्रथम आरक्षण दिले. स्वातंत्र्योत्तर काळात ते रद्द झाले व आरक्षण देणारा कायदा आमच्या सरकारने केला, मात्र न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे. आरक्षणासाठी जाळपोळ व तरुणांच्या आत्महत्या व्यथित करणाऱ्या आहेत.
शिवस्मारक सर्वात उंच
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जगातील सर्वात उंच स्मारक असेल, असे सांगतानाच मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपतींची उंची इतकी मोठी आहे, की पुतळ्याच्या उंचीने ती मोजली जाऊ शकत नाही.