निव्वळ प्रसिद्धीसाठी याचिका करणं हा स्टंट; गुणरत्न सदावर्तेंना मराठा आंदोलकांनी फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 05:49 PM2023-11-02T17:49:51+5:302023-11-02T17:50:46+5:30
हा सगळा सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार आहे असा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केला आहे.
मुंबई - मराठा आरक्षणाच्या आंदोलनात झालेल्या जाळपोळ प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. परंतु मराठा समाजाने कुठलीही हिंसा ठरवून केलेली नाही. जी काही घटना घडली त्याबद्दल आम्ही वारंवार दिलगिरी व्यक्त केलेली आहे. निव्वळ प्रसिद्धीसाठी हायकोर्टात जाऊन याचिका दाखल करून स्टंट करणे, हा पोलीस तपासावर प्रभाव टाकणारा प्रकार आहे अशी टीका मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्तेवर केली आहे.
विनोद पाटील म्हणाले की, जो काही प्रकार घडला, त्यावर पोलिसांनी व कायदे खात्याने सक्त कारवाई केलेली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आरोपी नक्की मराठा समाजाचे होते की आणखी दुसरे कोणी लोक होते, हा पोलिसांच्या तपासाचा विषय आहे. त्यात मी अधिक खोलात जात नाही. माझा मराठा बांधव जसा काही एखादा दहशतवादी असल्यासारखा आवाज गाजावाजा करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत रेकॉर्ड ब्रेक मोर्चे काढून आम्ही जगापुढे आदर्श ठेवला. शांततेत आंदोलने केली. यापुढील आमची आंदोलने ही याच प्रकारे होणार आहेत. शांतता आणि संयमाची शिकवण आम्हाला छत्रपतींची आहे. हा सगळा सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार आहे असा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केला आहे.
मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात गेले असून या याचिकेवर ८ नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते आणि मराठा आंदोलक हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. त्यात काही भागात हिंसक वळण लागले आहे. त्याविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.