Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींची भूमिका स्पष्ट व्हायला हवी, श्रीमंत शाहू छत्रपतींचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:50 PM2021-06-16T12:50:14+5:302021-06-16T12:50:41+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आलं.
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्यातील अनेक नेते, आमदार आणि खासदारांनी आंदोलनाला उपस्थिती लावली. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी हे मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती यांनी उपस्थितांना संबोधित करताना मराठा आरक्षणासाठी दिल्लीत आवाज बुलंद करण्याची गरज व्यक्त केली.
"मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती आपल्याला समजायला हवी. त्यांच्यापर्यंत आपला मुद्दा पटवून द्यायला हवा. दिल्लीत भाजप आज बहुमतात आहे. पंतप्रधानपदी तिथं नरेंद्र मोदी बसलेत त्यांच्यापर्यंत आपला बुलंद आवाज पोहोचायला हवा. आपण बलाढ्या आहोत असं समजून दिल्लीत आवाज पोहोचला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊनच दिल्लीत पाठपुरावा करायला हवा. समिती वैगेरे सगळं नाममात्र असतात पंतप्रधानांनी जर ठरवलं तर ते सगळं करू शकतात", असं श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले आहेत.
कोल्हापूरात झालेल्या या मूक आंदोलनात यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
कुणाच्या आरक्षणावर गदा आणून मराठा समाजाला आरक्षण नको
"मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे, हे पाहिलं पाहिजे, केवळ याचिका दाखल करून उपयोग नाही. यासाठी सर्व खासदार, आमदार, समाज यांनी एकत्र यावं. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल, नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही", असं सांगतानाच श्रीमंत शाहू छत्रपती यांनी इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर गदा आणून मराठा समाजाला आरक्षण नकोय. मराठा समाजासाठी स्वतंत्रच आरक्षण मिळायला हवं, मार्ग खूप खडतर आहे. पण अशक्य नाही. फक्त यासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं शाहू छत्रपती म्हणाले.