आरक्षणासाठी एल्गार! मराठा क्रांती मोर्चात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 04:23 PM2021-06-15T16:23:59+5:302021-06-15T16:31:12+5:30
उद्या कोल्हापुरात होत असलेल्या मराठा समाजाच्या मूक आंदोलनात आंबेडकर सहभागी होणार
कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. उद्या कोल्हापूरात मराठा समाज मूक आंदोलन करणार आहे. राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी थोड्याच वेळापूर्वी आंदोलनची रुपरेषा जाहीर केली. आता संपूर्ण राज्याचं लक्ष मूक आंदोलनाकडे लागलं आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरदेखील सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजें नी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे. त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज उद्या कोल्हापुरात जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजे यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी त्यांनी पुण्यात प्रकाश आंबेडकरांचीदेखील भेट घेतली होती. यानंचर आता प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या मूक आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
६ जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या १६ जूनपासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले होते. या आंदोलनाला उद्यापासून कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. शाहू समाधी स्थळी हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज संभाजीराजे आंदोलन स्थळी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी उद्याच्या मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसोबत संवाद साधला.
मराठा आरक्षणप्रश्नी गेल्या महिन्याच्या अखेरीस संभाजीराजेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल अथवा राष्ट्रपतीमार्फत पुनर्विचार याचिका हा सध्या कायदेशीर मार्ग आहे,' असं मत त्यावेळी आंबेडकर यांनी व्यक्त केलं होतं.
'आरक्षण हा समाजाला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मार्ग आहे. त्याचबरोबर प्रशासन आरक्षण हे अॅडमिनिस्टेशन प्रिन्सिपल होत आहे. पण इथले राज्यकर्ते ते मानायला तयार नाहीत. मराठा आरक्षणचा प्रश्न पुढे न्यायचा असेल तर त्यासाठी राज्यसत्तेची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणावर ससंदेत सांगितले की, आरक्षण ही एक खिडकी आहे. ती आम्ही खुली केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ही खिडकी बंद झाली आहे. त्यावर उपाय म्हणून राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पूवर्विचार याचिका दाखल करता येईल. ती फेटाळली तरी पुन्हा दुसरी याचिका दाखल करता येऊ शकते,' असं आंबेडकरांनी संभाजीराजेंसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.