मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 01:43 PM2024-09-29T13:43:31+5:302024-09-29T13:45:22+5:30

Manoj Jarange Patil News: मागण्या मान्य होत नसल्याने आता पुढील लढाई निवडणुकीची असेल, असे संकेत देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याही दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

maratha reservation protesters manoj jarange patil will likely to held dussehra melava in narayangad beed | मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!

मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!

Manoj Jarange Patil News: सगेसोयरेंची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून मराठा आरक्षण मिळण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सुरू केलेले उपोषण स्थगित केले. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीला सक्षम पर्याय म्हणून संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. या नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेटही घेतली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार असल्याची चर्चा आहे. या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे समजते. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर येथे विजयादशमी मेळावा होतो. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेतात. शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दसरा मेळावा घेऊन संबोधित करतात. तर पंकजा मुंडे या बीड येथे दसरा मेळावा घेतात. यात आता मनोज जरांगे पाटील यांची भर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. 

श्रीक्षेत्र नारायणगड येथे बैठक

एकीकडे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे दरवर्षी दसरा मेळावा होतो, त्यात आता मनोज जरांगे पाटील यांचा दुसरा दसरा मेळावा नारायणगड येथे होऊ शकतो. बीड जिल्ह्यात गड आणि गडांभोवती फिरणारे राजकारण, याचे एक वेगळे सामाजिक, अध्यात्मिक आणि राजकीय सूत्र तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गडावरच्या मेळाव्यांकडे सर्वांचच लागून असते, असे म्हटले जाते. हा दसरा मेळावा कुठे घ्यायचा? स्वरूप कसे ठेवायचे ? याबाबतचे नियोजन करण्यासाठी श्रीक्षेत्र नारायणगड येथे बैठक होणार आहे. या बैठकीला बीडमधील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण ठरणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तीव्र लढा उभारला आहे. आठवडाभर उपोषण करुनही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुढील लढाई निवडणुकीची असेल, असे संकेत मनोज जरांगे यांनी दिले आहेत. आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

 

Web Title: maratha reservation protesters manoj jarange patil will likely to held dussehra melava in narayangad beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.