मराठा आरक्षणाने दिला आणखी एक नेता ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 12:03 PM2019-07-01T12:03:50+5:302019-07-01T12:21:42+5:30
मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शविणाऱ्या नेत्यांची भेट विनोद पाटील घेत असल्याचे ऐकीवात असले तरी नरेंद्र पाटील, विनायक मेटे या मराठा नेत्यांनंतर विनोद पाटलांचाच उदय होणार, अशी चर्चा सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे.
- रवींद्र देशमुख
मुंबई - तब्बल २५ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा मराठा समाजाने काही अंशी जिंकला आहे. या लढाईत सर्वसामान्य मराठा मोठ्या प्रमाणात सामील होता. अनेक वर्षांपासून मराठा समाजातील विविध संघटना आरक्षणाचा पाठपुरावा करत होत्या. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मराठा समाजात एकच जल्लोष करण्यात आला. आरक्षणाच्या लढाईत विविध संघटना, राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत सामील होते. २५ वर्षांच्या कालावधीत या लढ्यातून महाराष्ट्रात दोन नेते उदयास आले. एक म्हणजे नरेंद्र पाटील आणि दुसरे म्हणजे विनायक मेटे. मराठा समाजाच्या चळवळीतून समोर आलेल्या नेत्यांमध्ये लवकरच विनोद पाटील यांचे नाव सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नरेंद्र पाटील यांचा लौकीक माथाडी कामगारांचे नेते म्हणून असला तरी मराठा चेहरा म्हणूनच ते सर्वांना परिचीत आहेत. तर विनायक मेटे यांचे नेतृत्व देखील मराठा चळवळीतून समोर आले. दोन्ही नेते कधीकाळी राष्ट्रवादीमध्ये होते. मात्र आता दोघेही सत्ताधारी भाजपसोबत आहेत.
दोन वर्षांपू्र्वी मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीने राज्यभरात उठाव घेतला होता. राज्यभरात एकूण ५८ उत्स्फुर्त मूक मोर्चे निघाले होते. या मोर्चांना लाखोंची गर्दी जमली होती. मराठा समाज स्वयंप्रेरणेने मोर्चात सहभागी झाला होता. त्यातून राज्यभरातील अनेक जिल्ह्यात मराठा संघटनांमध्ये काम करत असलेल्या नेत्यांना सुगीचे दिवस येणार हे स्पष्टच होते. परंतु, मोर्चाची आचारसंहिता पाहता, कुणालाही स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करणे शक्य झाले नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक हे पद निर्माण करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात अनेक समन्वयक तयार झाले. त्यातून मीडियासमोर जाण्यासाठी याच समन्वयकांमध्ये चढाओढ लागत होती. परंतु, मीडियाच्या मदतीने देखील आपलं नेतृत्व सिद्ध करण्यात एकाही मराठा नेत्याला यश आले नाही.
दरम्यान मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर सुरू असताना न्यायालयीन लढ्याकडे स्थानिक नेत्यांनी फारसे लक्ष दिले नाही. तर विनोद पाटील यांनी चिकाटीने मराठा आरक्षणाचा लढा न्यायालयात सुरुच ठेवला. २५ जुलै २०१८ रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे सहाजिकच सर्वांच्या नजरा न्यायालयाच्या निकालावर आणि त्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विनोद पाटलांवर लागल्या.
मराठा आरक्षणाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर विनोद पाटलांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. त्याचवेळी त्यांच्याकडे मराठा चळवळीतील संभाव्य नेता म्हणून पाहण्यास सुरुवात झाली, असं म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यातच आता पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरणार नाही, तेच नवल. पाटील यांच्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शविणाऱ्या नेत्यांची भेट विनोद पाटील घेत असल्याचे ऐकीवात असले तरी नरेंद्र पाटील, विनायक मेटे या मराठा नेत्यांनंतर विनोद पाटलांचाच उदय होणार, अशी चर्चा सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मराठा नेते भाजपसोबत
नरेंद्र पाटील यांचा लौकीक माथाडी कामगारांचे नेते म्हणून असला तरी मराठा चेहरा म्हणूनच ते सर्वांना परिचीत आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली असून त्यांनी नुकतीची सातारा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली आहे. तर मराठा चळवळीतून पुढे आलेले विनायक मेटे विधानपरिषदेवर आमदार असून शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. दोन्ही नेते कधीकाळी राष्ट्रवादीमध्ये होते. मात्र बदलेली राजकीय परिस्थिती पाहता आता सत्ताधारी भाजपसोबत आहेत.